केसरकरांच्या घरासमोर उद्या युवासेनेचे “बोंबाबोंब” आंदोलन
युवासेना कोकण सचिव तथा जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती
डीएड बेरोजगार समस्या, ना झालेली शिक्षक भरती याकडे वेधणार लक्ष
प्रतिनिधी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांमध्ये अजूनपर्यंत शिक्षक न दिल्याने शिक्षण विभागाची,विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची तसेच स्थानिक डीएडच्या बेरोजगारांची प्रचंड कुचंबणा होत आहे. त्याकडे नामदार शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकदिनी म्हणजेच ५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता युवासेनेच्या वतीने, केसरकर यांच्या घरासमोर युवासेना कोकण सचिव तथा जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत *बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात बेरोजगार युवक युवती,डिएड बेरोजगारानी यांनी तसेच युवासेना पदाधिकारी, युवासैनिकांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन युवासेनेकडून करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या शिक्षणाचा खेळखंडोबा सुरु आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या शेकडो शिक्षकांच्या विनंती बदल्या जिल्ह्याबाहेर करण्यात आल्या. त्यांच्या बदल्यात पर्यायी शिक्षक देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शिक्षकांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासू लागला आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या जुलै महिन्याच्या सुरुवातीला करण्यात आल्या. त्यामुळे शिक्क्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर अवघ्या महिनाभरातच शिक्षकांची आणि पालकांची तारांबळ उडाली. त्यामुळे पालकवर्गात प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. सध्या अनेक शाळांमध्ये एकच शिक्षक कार्यरत असून त्याला चार चार वर्ग सांभाळावे लागत आहेत. शिवाय अशैक्षणिक कामांची टांगती तलवार त्यांच्या माथ्यावर आहे ती वेगळीच. या शिक्षकांचा भार कमी करण्यासाठी नवीन शिक्षक नियुक्त करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील डीएड धारक देखील बेरोजगारीच्या खाईत आहेत.
जिल्ह्यातील शिक्षणाचा असा खेळखंडोबा झालेला असताना, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठीच हे आंदोलन करण्यात येणार आहे. युवा सैनिक, पालक, डीएड बेरोजगार यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन युवासेनेकडून करण्यात आले आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.