मंत्री दीपक केसरकरांनी अशी कोणती जादूची कांडी फिरविली की कायम विरोधात बोलणारे केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे त्याच्या मांडीला मांडी लावून बसले

कोणत्या मुद्दावर ते एकत्र आले – माजी आमदार परशुराम उपरकर याचा सवाल
सावंतवाडी
मंत्री दीपक केसरकरांनी अशी कोणती जादूची कांडी फिरविली की कायम विरोधात बोलणारे केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. या मागचे नेमके गमक काय? कोणत्या मुद्दावर ते एकत्र आले की ही सर्वसामान्य मतदारांची फसवणूक आहे? असा सवाल आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार तथा मनसेचे नेते परशुराम उपरकर यांनी आज येथे केला.
दरम्यान जिल्ह्याच्या भाजपात दोन ते तीन गट पडले आहेत. त्यामुळे सर्वजण एकमेकाला संपवायला निघाले आहेत. याचाच परिपाक दोडामार्ग येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत पहायला मिळाला. आपलेच लोक विरोधात गेले हे राणेंना अप्रत्यक्षरित्या कबूल करावे लागले, असेही त्यांनी सांगितले.
श्री. उपरकर यांनी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दिपक केसरकर आणि नारायण राणेंवर सडकुन टिका केली. ते म्हणाले, या ठिकाणी दीपक केसरकर यांनी कायम स्वार्थी राजकारण केले आहे. दहशतवादाचा मुद्दा पुढे करुन त्यांनी नेहमीआपला स्वार्थ साधला आहे. पहिले ते शिवसेनेत गेले आणि त्यानंतर त्यांनी शिंदे गटात मंत्रीपद मिळविले. या काळात सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांबाबत त्यांना कोणतेही सोयर-सुतक राहिले नाही. त्यांनी जाहीर केलेली विकासकामे, रोजगाराभिमुख प्रकल्प आणि आश्वासने पुर्ण झालेली नाहीत.
यावेळी उपरकर यांनी राणेंवर टिका केली. ते म्हणाले, राणे मुख्यमंत्री असताना त्यांनी दोडामार्ग तालुक्याची निर्मिती केली. त्यानंतर तेउद्योगमंत्री होते. परंतु नंतरच्या दहा वर्षात त्यांना कोणताही विकास किंवा रोजगाराचा प्रकल्प आणण्यास का जमला नाही . याचे त्यांनी उत्तर द्यावे. फक्त सिंधुदुर्गाचा जीडीपी वाढला, असे सांगुन लोकांची दिशाभूल करू नये. ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग भाजपात आता दोन ते तीन गट पडले आहेत. जो तो एकमेकाला संपविण्यासाठी निघाला आहे. त्याचा प्रत्यय दोडामार्ग मध्ये घेण्यात आलेल्या सभेच्यावेळी
आला.





