कनेडी – नरडवे रस्त्यावर शिवसेना ठाकरे गटाकडून रास्ता रोको!

भर पावसात रस्त्यावर बसून घोषणाबाजी देत केली कारवाईची मागणी
ठेकेदारावर कारवाईच्या आश्वासनाअंती आंदोलन मागे
कनेडी-नरडवे या प्रमुख मार्गावरील कनेडी ते दुबळेश्वर या टप्प्यातील रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत सार्वजनिक बांधकामाचे लक्ष वेधूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने ठाकरे शिवसेनेच्यावतीने शुक्रवारी दुपारी कनेडी बाजारपेठेमध्ये जोरदार घोषणाबाजी करत सुमारे अर्धातास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बंद करा बंद करा… बेनामी ठेकेदारी बंद करा, आवाज कोणाचा शिवसेनेचा अशा घोषणांनी बाजारपेठ परिसर दुमदुमून गेला. धो धो पावसात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेना कार्यालयासमोर रस्त्यावर बसून आंदोलनात सहभागी झाले होते. अखेर सा. बा. च्या उपअभियंत्यांनी प्रत्यक्ष आंदोलनकर्त्यांची भेट घेवून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आणि पावसाळ्यानंतर रस्ता सुस्थितीत करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर कार्यकारी अभियंत्यांनीही आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत निकृष्ट काम करणार्या ठेकेदारावर कारवाई करण्याचे आणि रस्त्याचे काम चांगल्याप्रकारे करून देण्याची ग्वाही दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनामध्ये शिवसेना नेते सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख निलम पालव, कणकवली तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, सचिन सावंत, नाटळ विभागप्रमुख आनंद आचरेकर, कुंभवडे माजी सरपंच आपा तावडे, सौ. अनिषा सावंत, सौ. दिव्या साळगावकर, गुरुनाथ पेडणेकर, हेमंत सावंत, बेनी डिसोजा, मुकेश सावंत, कुणाल सावंत, तुषार गावकर आदींसह ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाली होते. कणकवलीचे पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही वेळाने पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी आंदोलनकर्त्यांना समजावत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याठिकाणी येत नाहीत तोपर्यंत हलणार नाही असा पवित्रा शिवसेना पदाधिकार्यांनी घेतला. मे महिन्यात केलेल्या रस्त्यावर खड्डे पडले असून संपूर्ण खडी उखडली आहे. अनेकांचा त्याठिकाणी अपघात झाला आहे, त्याला जबाबदार कोण? असा सवाल प्रथमेश सावंत, उत्तम लोके यांनी केला. त्यानंतर काही वेळाने सार्वजनिक बांधकामच्या कणकवलीच्या उपअभियंता के.के.प्रभू, शाखा अभियंता राहुल पवार हे कनेडीत दाखल झाले. आणि त्यांनी आंदोलनकर्त्यांना रस्त्याचा खराब झालेला पोर्शन दुरूस्त करुन देण्याची ग्वाही देत क्वॉलिटी कंट्रोलमार्फत रस्त्याची चाचणी करणार असल्याचे सांगितले. यावेळी सतीश सावंत यांनी क्वॉलिटी कंट्रोल किंवा अन्य तपासणी यंत्रणा असेल, पैसे मिळाले की अहवाल हवा तसा दिला जातो त्यामुळे त्याच्यावर आमचा विश्वास नाही. 31 ऑगस्टच्या आत कनेडी ते दुबळेश्वर दरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवा आणि उखडलेली खडी बाजूला करा. तर 15 ऑक्टोबरनंतर रस्त्याचे काम निकषाप्रमाणे करून घ्या. दोषी ठेकेदारावर कारवाई करा अशी मागणी केली. त्यानंतर अधिकार्यांनी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधून दिला. यावेळी सतीश सावंत यांनी संबंधित ठेकेदार जोपर्यंत चांगल्याप्रकारे काम करून देत नाही तोपर्यंत त्याला कोणतेही नवे काम देवू नये. त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करावी अशी मागणी केली. त्यानंतर श्री. सर्वगोड यांनी दोषी ठेकेदारावर कारवाईचे आश्वासन देत रस्ता दुरुस्तीबरोबरच दर्जेदार काम करून देण्याची ग्वाही दिली.
दिगंबर वालावलकर कणकवली