आनंदी माणसं यशस्वी होतात- डॉ.मोहित गुप्ता

बी आय डी एफ तर्फे व्याख्यानाचे आयोजन
जयसिंगपूरः आपल्या विचारधारेनुसार आपले विचार सर्वांना प्रेरणा देत असतात. जीवनाचा दृष्टिकोन बदलल्यास जीवन सुखी समाधानी होते. यशस्वीतेसाठी स्वयंप्रेरणा आवश्यक आहे.आपल्याला जीवनाचा आनंद लुटता यायला हवा.आनंदी माणसं कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होतात. असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते, कार्डिओलॉजिस्ट डॉ.मोहित गुप्ता यांनी केले. ते संजय घोडावत विद्यापीठात बिजनेस अँड इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट फोरम (बीआयडीएफ) तर्फे आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते.
यावेळी त्यांनी यशस्वी,सुखी समाधानी जीवनाचा मंत्र दिला. जीवन हा एक प्रवास आहे स्पर्धा नाही.व्यक्ती व्यक्ती मधील चांगले संबंध, स्वतःचे मार्ग स्वतः बनवा, छोटे छोटे बदल आयुष्यात चमत्कार घडवतात, आपल्याला काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं, मनाला साफ करत राहणे गरजेचे आहे. सल्ले देण्याबरोबरच आधार देणे जास्त महत्त्वाचे आहे. स्वतःमध्ये बदल केल्यास परिवर्तन निश्चित आहे. त्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा.सकारात्मकता, मनोशक्ती आणि आध्यात्मिक शक्ती याद्वारे आपणास यश मिळते,असा उपदेश त्यांनी केला. यावेळी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि फोरमचे संस्थापक संजय घोडावत यांनी बी आय डी एफ चे 180 सदस्य झाल्याचे सांगितले. या भागातील उद्योग व्यवसायाचा विकास संवादाच्या माध्यमातून फोरम द्वारे होणार असून यासाठी सदस्य संख्या वाढवणे व जबाबदारीने काम करणे गरजेचे असल्याबद्दल आपले मत मांडले.
मान्यवरांचे आभार फोरमचे सेक्रेटरी महेंद्र परमार यांनी मानले.तर सूत्रसंचालन सोहम तिवडे यांनी केले. यावेळी बीआयडीएफ उपाध्यक्ष उद्योजक अण्णासाहेब चकोते, संचालक राजीव पारेख, प्रकाश मेहता, गिरीश शहा, देवचंद संघवी, अमित माटे, दिलीप पटेल, व्यावसायिक, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.





