नानिवडेकर यांचे काव्य अमर आहे
![](https://kokannow.in/wp-content/uploads/2023/07/IMG-20230712-WA0008.jpg)
डॉ संजीव लिंगवत आणि रुपाली पाटील यांचे प्रतिपादन.
सिंधू वैभव साहित्य समूहाच्या दुसऱ्या नानिवडेकर काव्य पुरस्काराचा वितरण सोहळा.
अंजली मुतालिक, एजाज शेख आणि मिताली तांबे या मानकरी. कन्या अपूर्वा नानिवडेकर यांची उपस्थिती.
“मधुसूदन नानिवडेकर हे सिंधुदुर्ग येथील नानिवडे या गावाचे एक महान व्यक्तिमत्व होते. त्यांनी गझल , साहित्य, पत्रकार या क्षेत्रात चौफेर कामगिरी केली. “भलभलते सांगतेस”, “हरकत नाही,” “मनात चांदणे” अशा अनेक अफलातून गझल त्यांनी लिहिल्या. त्यांचे काव्य अमर आहे” असे डॉ संजीव लिंगवत , जनसेवा प्रतिष्ठान , वेंगुर्ला यांनी सिंधू वैभव साहित्य समूहाच्या दुसऱ्या मधुसूदन नानिवडेकर काव्य पुरस्कार प्रदान कार्यक्रमात काढले
मिताली तांबे, घाटकोपर, मुंबई यांनी पुरस्कार स्वीकारताना” माझा लेखन प्रवास वाचनामुळे सुरू झाला ज्याची सवय मला माझ्या वडिलांनी लावली. पती महेंद्र तांबे यांनी मला पुस्तक छापायची सूचना केली” असे सांगितले. त्यांच्या मित काव्य या संग्रहाला हा पुरस्कार मिळाला आहे.
एजाज शेख या पुसदा, जिल्हा अमरावती येथील तरुण कवीने आपले मनोगत व्यक्त करताना “जात पात, धर्म, वंश, वय या पलीकडे जावून सिंधू वैभव साहित्य समूहाने पुरस्कार दिल्याबद्दल आभार मानले.
"२०१७ ला कणकवली इथे झालेल्या ब्रह्म कमळ या गझल कार्यक्रमात नानिवडेकर अध्यक्ष होते. त्यात आपण सहभाग घेतल्याची आठवण त्यांनी सांगितली. त्यांच्या "स्वच्छ हृदयाचे झरे 'या संग्रहाला हा पुरस्कार मिळाला आहे.
अंजली मुतालिक या कुडाळ, सिंधुदुर्ग येथील कवयित्रीने नानिवडेकर यांच्या अनेक सुंदर पंक्ती सादर करून पुरस्कार स्वीकारला. “सर्व लिहित्या हाताना प्रोत्साहन देणे, फोनवरून सतत संपर्क ठेवणे हा त्यांचा गुण होता. काहीही जड न लिहिता साधे सोपे कसे लिहावे याचे ते मार्गदर्शन करत.” असं अंजली मू तालिक यांनी सांगितले अंजली यांनी नानिवडेकर यांच्या सोबत सहभाग घेतलेल्या अनेक कार्यक्रमांचा उल्लेख केला. त्यांच्या “विवेकांजली “या संग्रहाला हा पुरस्कार मिळाला आहे.
नानिवडेकर यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हा बहुमान आहे असे मत तिन्ही कवींनी व्यक्त केले.
नानिवडेकर यांच्या सुकन्या अपूर्वा यांनी बाबांच्या आठवणींना जागृत केले. शब्दप्रभू बाबा आज असते तर म्हणाले असते ‘ “मिळेल त्या शब्दात मी आभार मानतो, देण्याजोगे एवढेच हे आहे माझ्यापाशी’ “असे त्या म्हणाल्या.
साहस प्रतिष्ठानच्या रुपाली पाटील, वेंगुर्ला व डॉ संजीव लिंगवत, जनसेवा प्रतिष्ठान , वेंगुर्ला यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले गेले. रुपाली पाटील या दिव्यांग लोकांसाठी तळमळीने काम करत असून डॉ संजीव लिंगवत हे वैद्यकीय, सामाजिक, राजकीय, साहित्यिक क्षेत्रातील मोठे नाव आहे.
यावेळी कवी डॉ सतीश पवार, कणकवली यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहलता राणे ( लता सरंगले) अध्यक्ष सिंधुवैभव साहित्य समूह, कणकवली यांनी आभार व्यक्त केले.
तांत्रिक सहाय्य शैलेश घाडी यांनी केले
कोकण नाऊ या चैनल वरून या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले होते
नानिवडेकर यांचे दोन वर्षापूर्वी अकरा जुलै २०२१ ला निधन झाले. त्यांनी वाशी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाचे अध्यक्ष पद भूषविले होते. चांदणे नदीपात्रात हा त्यांचा प्रसिद्ध काव्यसंग्रह आहे. नानिवडेकर यांच्या गौरवा प्रित्यर्थ सिंधू वैभव ने गतवर्षापासून हा पुरस्काराचा उपक्रम सुरू केलेला आहे
कणकवली ब्यूरो न्यूज