नाथ पै सेवांगणतर्फे १० जून रोजी ‘सारेच पुरुष नसतात बदनाम’ ग्रंथावर चर्चासत्र

समीक्षक प्राचार्य डॉ.शोभा नाईक यांच्यासह विविध अभ्यासकांचा सहभाग

बॅ.नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर यांची माहिती

 कवी अजय कांडर, ललित लेखक वैभव साटम आणि सांस्कृतिक कार्यकर्ते मधुकर मातोंडकर यांनी 'सारेच पुरुष नसतात बदनाम' या 19 कवयित्रींच्या कवितांचा समावेश असलेल्या प्रातिनिधीक काव्यसंग्रहाचे संपादन केले. आता या संग्रहावर बॅ. नाथ पै सेवांगण मालवणतर्फे शनिवार १० जून रोजी स.१०.३० वा. सेवांगणच्या सभागृहात बेळगाव येथील ख्यातनाम समीक्षक प्राचार्य डॉ.शोभा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सेवांगणचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर यांनी दिली.
'सारेच पुरुष नसतात बदनाम' हा बहुचर्चित प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रभा प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे.यात कोकणसह महाराष्ट्रातील एकोणीस कवयित्रींच्या प्रत्येकी चार कवितांचा समावेश आहे. या संग्रहावर आता स्वतंत्र चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून डॉ शोभा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या चर्चासत्रात समीक्षक प्रा.संजीवनी पाटील, कवयित्री तथा पुणे येथील डेप्युटी कमिशनर अंजली ढमाळ, कवी अजय कांडर,ललित लेखक वैभव साटम, सांस्कृतिक कार्यकर्ते मधुकर मातोंडकर आदी सहभागी होणार आहेत.
दरम्यान यावेळी या संग्रहातील या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या मनीषा शिरटावले, डॉ.योगिता राजकर,रीना पाटील, प्रमिता तांबे,कल्पना बांदेकर,प्रियदर्शनी पारकर,ऍड.मेघना सावंत,स्नेहा राणे,नीलम यादव,मनीषा पाटील,ऍड. प्राजक्ता शिंदे,रुपाली दळवी नाईक,प्रा.सुचिता गायकवाड आदींचा स्मृतीचिन्ह, ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात येणार आहे.पुरुषी मानसिकतेच्या भारतीय परंपरेत स्त्रीचे दमन ही एक सनातनी वहिवाट आहे. स्त्रीच्या शरीरावर हक्क सांगता सांगता तिचा मेंदूही ताब्यात घेण्यासाठी आसुसलेली पुरुषी वृत्ती आणि पितृसत्ता परंपरेमुळे तिला दुय्यम स्थान मिळत गेले. यामुळे पुरुष तिला समानधर्मी वाटणे ही दुरापास्तच गोष्ट. मात्र अपवादात्मक घटना घडवी तसे बदलत्या आधुनिक काळाबरोबर बाईच्या आयुष्यात बाप,भाऊ, पती, मित्र, प्रियकर यापैकी कोणतरी आयुष्यात समानधर्मी मिळतो. असा क्वचित अनुभव आता स्त्रीला येतो आहे. नाहीतरी स्त्रीला समानधर्मी वाट महापुरुषांनी निर्माण केलेलीच आहे. या विचाराला केंद्रस्थानी ठेवून या कवितांचे लेखन करण्यात आलेले आहे. मराठी कवितेत असा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आल्यामुळे या काव्यसंग्रहावर सदर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमात साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नाथ पै सेवांगणचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी केले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!