मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उदया सावंतवाडीत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या दि. ६ जून रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी शहरात येत आहेत. त्यांच्या हस्ते सुमारे ३० ते ४० कोटी रुपयांच्या कामांची भूमिपूजन करण्यात येणार आहेत. त्याचा आढावा स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी बैठकीत घेतला. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री रवींद्र चव्हाण व अन्य मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कुडाळ येथे हा कार्यक्रम होणार आहे. त्यापुर्वी सावंतवाडी शहरात सकाळी १० वाजता सावंतवाडी शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे असे केसरकर यांनी सांगितले.
सावंतवाडी शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडई संकुल, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त कै रमाकांत आचरेकर क्रिकेट ड्रेस गॅलरी व अन्य कामांची भूमिपूजन समारंभ एकाच ठिकाणी संत गाडगेबाबा भाजी मंडई मध्ये होणार आहे. तसेच दोडामार्ग रूग्णालय, सावंतवाडी शासकीय विश्रामगृह, व बॅरिस्टर नाथ पै सभागृहाचे लोकार्पण करण्यात येणार आहे, असे मंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि अन्य मान्यवर नेते, मंत्री उपस्थित राहणार आहेत असे त्यांनी सांगितले.

सावंतवाडी / प्रतिनिधि

error: Content is protected !!