एस.टी.थांब्यावर रु.३० मध्ये चहा-नाश्ताची सोय

प्रशासनाकडून अंमलबजावणी व्हावी
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे आवाहन
वैभववाडी
नाथजल पाणी बाटली छापील किंमतीपेक्षा जादा दराने विक्री करणे व अधिकृत खाजगी थांब्यांवर रुपये ३०/- मध्ये चहा-नाश्ता योजनेची अंमलबजावणी होत नसलेबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या योजनेची योग्य अंमलबजावणी करणेसाठी महाराष्ट्रातील सर्व विभाग नियंत्रक यांना महाव्यवस्थापक (नियोजन व पणन) यांचे पत्र क्र.राप/निवप/वाआ/५५५, दि.२५ मे,२०२३ अन्वये कळविले आहे.
काही दिवसांपासून नाथजल या प्रकल्पाबाबत बस स्थानकातील वाणिज्य आस्थापना परवानाधारक / नाथजल वितरक गालबोट लावित असल्याच्या तक्रारी व संदेश पसरत आहेत. बस स्थानकावरील कार्यरत पर्यवेक्षक व अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा सुर जनमानसात दिसून येत आहे.
तसेच रा.प.अधिकृत खाजगी थांब्यांवर रु.३०/- मध्ये चहा-नाश्ता योजनेची अंमलबजावणी होत नसलेबाबतच्या तक्रारी आहेत. रा.प.कार्यालयामार्फत अधिकृत खाजगी हाॅटेलचे निवडपत्र विभागास देताना,रा.प.प्रवाशांना अधिकृत खाजगी हाँटेल मालकांनी रु.३०/- मध्ये चहा-नाश्ता उपलब्ध करून देण्याचे बंधन हाॅटेल मालकास आहे. असे बंधनपत्र हाँटेल मालकाकडून घेतल्यानंतरच मान्यता दिली जाते. रु.३०/- मध्ये चहा-नाश्ता योजनेच्या अनुषंगाने या कार्यालयाचे पत्र क्रं.राप/निवप/वाआ/३११८, दि.२ जानेवारी,२०१९ अन्वये कार्यवाही करणे क्रमप्राप्त असतांना स्थानिक पातळीवरील विभागामार्फत /आगारामार्फत करण्यात येत नाही.संबधित रा.प. पर्यवेक्षकांवर/अधिका-यांवरही कार्यवाही अथवा जबाबदारी निश्चित होत नाही, ही खेदाची बाब आहे.
नाथजल व रु.३०/- मध्ये चहा-नाश्ताची अंमलबजावणी होत आहे की नाही याची खातरजमा करण्याची जबाबदारी कर्तव्यावरील वाहतूक पर्यवेक्षक व मार्गतपासणी पथकाची राहील.
प्रवासी हितास्तव राबविण्यात येणाऱ्या या योजनांची अंमलबजावणीची तपासणी वेळोवेळी विभागामार्फत/प्रदेशांमार्फत दक्षतेने करण्यात यावी जेणेकरून प्रवासी तक्रारीस वाव मिळू नये अशा प्रकारच्या सूचना या पत्रात करण्यात आल्या आहेत.
तसेच सर्व प्रवाशांनी एस.टी.चे प्रवासी ग्राहक या नात्याने सजग राहून आपले हक्क, अधिकार आणि कर्तव्ये याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. नाथजल पाणी बाटली छापील किमतीला खरेदी करणे, एस.टी.अधिकृत थांब्यावर थांबली आहे का, नसल्यास वाहक/चालकांकडे विचारणा करावी, त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यास एस.टी.तक्रार नोंदवहीत तक्रार करावी असे आवाहन ग्राहक पंचायत यांनी केले आहे