घरफोडी करून मोबाईल, ॲसेसरिज चोरून विकल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता

संशयित आरोपीच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद

ओरोस येथील सिद्धांत चंद्रशेखर सावंत याचा वनप्लस कंपनीचा किमती मोबाईल, सॅमसंग कंपनीचा मोबाईल व अन्य साहित्य चोरून ते ऑनलाईन पद्धतीत ओएलएक्सवर विकल्याप्रकरणी कणकवली येथील प्रणव प्रकाश दळवी याची मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एम. फडतरे यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
दि. २१ एप्रिल २०१८ रोजी पहाटेच्या सुमारास फिर्यादी सिद्धांत सावंत हा ओरोस येथील आपल्या घरी झोपलेला असताना खिडकीचे तावदान बाजूला करून आरोपीने खोलीत प्रवेश केला. यावेळी आरोपीने त्याचा सुमारे ३० हजार रुपये किमतीचा वनप्लस कंपनीचा मोबाईल व सॅमसंग कंपनीचा मोबाईल, हार्डडिस्क असे साहित्य सिद्धांतच्या डोळ्यावर स्प्रे मारून चोरून नेले. याप्रकरणी सिद्धांत याने दिलेल्या फिर्यादीनुसार मास्क लावलेल्या अज्ञात इसमाविरुद्ध भादंवि कलम ३९४, ४५८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेनंतर स्थानिक गुन्हा अन्वेषणकडून याचा तपास सुरू होता. यात फिर्यादीने दिलेल्या आयएमईआय नंबरनुसार पोलीस शोध घेत होता. दरम्यानच्या कालावधीत २८ जुलै २०१८ रोजी ओएलक्स या ॲपवर त्या मोबाईलची विक्रीची जाहिरात प्रसिद्ध झाल्याने पुणे येथील सुरेश रामलू राठोड याने त्या मोबाईलबाबत आरोपीशी संपर्क साधून विकत घेतला. त्यानंतर राठोड याने मोबाईल चालू केला असता स्थानिक गुन्हा अन्वेषणला ११ ऑगस्ट २०१८ रोजी त्या मोबाईलचे लोकेशन मिळाले. त्यानुसार त्यांनी तपास करून आरोपी प्रणव दळवी याच्यावर कारवाई करून दोषारोपपत्र दाखल केले.
सुनावणीत सरकारपक्षातर्फे तपासलेल्या साक्षीदारांच्या साक्षीतील त्रुटी, जप्ती पंचनामा सिद्ध न होणे, मोबाईलचा मूळ मालक लक्ष्मण सुखराजकुमार पवार असल्याचे निष्पन्न होणे, तसेच घटनेनंतर फिर्यादी याच्या जबाबातील तफावती यामुळे आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!