भिरवंडे विकास संस्थेचा “मिरग महोत्सव” हा जिल्ह्यातील अनोखा उपक्रम

खासदार विनायक राऊत यांचे गौरव उद्गार
भिरवंडे विकास सेवा संस्थेचा आगळावेगळा उपक्रम असून मिरग महोत्सवांमध्ये बचत गटांच्या उत्पादित वस्तूला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी चांगले प्रयत्न केले. या महोत्सवांमध्ये महिलांनी सागोती- वडे, शेवया- रस आणि घावणे अप्रतिम बनवले होते. मालवणी महिलेच्या हाताला जी चव आहे, ती जगात कुठल्याही महिलेच्या हाताला नाही असे उद्गार खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केले. भिरवंडे विविध कार्यकारी सेवा सोसायटी आयोजित मिरग महोत्सवाला खासदार विनायक राऊत यांनी आज येथे भेट दिली.
येथील समाधी पुरुष सभागृहाच्या समोरील मोकळ्या जागेमध्ये शनिवारपासून सुरू झालेल्या या मिरग महोत्सवाला आज दुपारी खासदार यांनी भेट देऊन महिलांच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना सह संपर्कप्रमुख अतुल रावराणे,जिल्हा बँकेचे संचालक सुशांत नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत कन्हैया पारकर, सचिन सावंत, मंगेश सावंत, चेअरमन बेनी डिसोजा आदी उपस्थित होते. संस्थेच्या वतीने खासदार राऊत यांचा सत्कार चेअरमन बेनी डिसोजा यांनी केला. यावेळी महीलांनी उत्पादित केलेल्या विविध पदार्थांची चव खासदार राऊत यांनी चाखली. त्यानंतर महिलांना मार्गदर्शन करताना स्पष्टपणे नमूद केले की, भिरवंडे संस्थेचा हा उपक्रम जिल्ह्यात आगळावेगळा आहे. गावातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून वस्तू उत्पादित करून त्याची विक्री करण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली. खऱ्या अर्थाने हा उपक्रम सर्व ठिकाणी राबवून. प्रत्येक गावांमध्ये महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी चांगली संधी आहे. अशा या नाविन्यपूर्ण संकल्पने चा उपयोग इतर गावांमध्ये होणे अपेक्षित आहे असे श्री. राऊत यांनी नमुद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक तुषार सावंत यांनी केले.
कणकवली प्रतिनिधी