महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने किल्ले रामगडावर अवतरली शिवशाही

दुर्गवीर प्रतिष्ठानच्या दीप-मशालोत्सवाने उजळला रामगड
आचरा– अर्जुन बापर्डेकर

भगव्या पताका,ढोलताशांचा गजर, रांगोळीचा सडा, माड आणि केळीच्या झाडांमुळे आलेला पारंपारिक साज, झेंडूच्या फुलांनी सजलेला गडाचा प्रत्येक तट-बुरुज, ‘हर हर महादेव’ आणि ‘जय भवानी जय शिवराय’ चा जयघोष,
पूजा-आरती मुळे तयार झालेलं भक्तीमय वातावरण आणि पणत्यांच्या आणि मशालींच्या तेजोमय प्रकाशात न्हावून निघालेला रामगड

..निमित्त होतं दुर्गवीर प्रतिष्ठान आणि रामगड ग्रामस्थ यांच्या वतीने रामगड किल्ल्यावर साजरा करण्यात आलेला महाराष्ट्र दिन

स्थानिकांच्या सहकार्याने किल्ले रामगडावर मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात हा महाराष्ट्र दिन साजरा केला गेला ..

२०१५ साली दुर्गवीर प्रतिष्ठान च्या माध्यमातून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या किल्ल्याच्या संवर्धनाची सुरूवात झाली होती. तेव्हापासून हा गड सतत संवर्धनाच्या माध्यमातून उजळविण्याचा प्रयत्न दुर्गवीर प्रतिष्ठान करत आहेत. पारंपरिक सण-उत्सव गडावर आयोजित करून गड जागता ठेवण्यासाठी दुर्गवीर प्रयत्नशील आहेत. आज अनेक हात या कार्यात जोडले गेले आणि कामाला एक गती मिळाली आहे.

सकाळी गडाच्या पायथ्यापासून ते गडाच्या माथ्यापर्यंत महाराजांची पालखी नेण्यात आली, वाजत गाजत आनंदात, उत्साहात स्थानिकांच्या हस्ते गणेशाचे आणि शिवमूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मंत्रोच्चार, आरती, गारद,घोषणा यामुळे भक्तीमय वातावरण तयार झालं होतं.

सायंकाळच्या सत्रात ज्या कार्यक्रमाची सगळे जण आवर्जून वाट पाहते तो कार्यक्रम म्हणजे गडावर होणारा दीपोत्सव आणि मशालोत्सव.. तब्बल हजार एक दिव्यांची आरास गडावर करण्यात आली होती, ७० मशाली पेटवण्यात आल्या हाेत्या. मशालींच्या आणि दिव्यांच्या तेजोमय प्रकाशात गड अगदी उजळून निघाला होता. जणू काही शिवकाळ पुन्हा आमच्या डोळ्यासमोर उभा होता. मशालीच्या साथीने गडाच्या तटावरून, तटबंदीबाहेरून एक फेरी देखील करण्यात आली. ठिकठिकाणी रिंगण करत, महाराजांचा जयजयकार करून, पारंपरिक स्फूर्तीगीते व महाराष्ट्र गीत गाऊन या उत्सवाची सांगता करण्यात आली..

कार्यक्रमाचा शेवट गडावर एक छोटेखानी आभारप्रदर्शनाने झाला. उपस्थितांमधून ब-याच शिवप्रेमींनी दुर्गवीर प्रतिष्ठानच्या कार्याचे आणि आयोजनाचे तोंडभरून कौतुक केले.
दुर्गवीर प्रतिष्ठान ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रभर अपरिचित गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील रामगड, भगवंतगड या किल्ल्यावर संस्थेचे काम चालते. प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी दुर्गवीरांच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमांचे आयोजन केले जाते. रामगड,भगवंतगडावर सातत्याने होत असलेल्या स्वच्छता मोहिमा, गडावरील कार्यक्रम व कार्यामुळे गड पुन्हा एकदा नावारुपास येत आहेत. आपणही छ. शिवाजी महाराजांच्या कार्याचे साक्ष असणारे हे गडकिल्ले जपण्यासाठी दुर्गवीर सोबत सहभागी साधून या शिवकार्यास हातभार लावावा असे आवाहन दुर्गवीर प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!