शास्त्रीय गायन विभागात रत्नागिरीचा चैतन्य परब तर सवेष साभिनय नाट्यगीत गायन मध्ये कु. वेदा राऊळ व कु. ममता प्रभू “राधाकृष्ण चषक २०२३” चे मानकरी

‘श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग’ व ‘स्वयंभू कला क्रीडा मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने आजगांव येथे संपन्न झाला “राधाकृष्ण चषक २०२३” हा सांगितिक महोत्सव.

सावंतवाडी प्रतिनिधि

आपल्या भारतीय संस्कृतीचा सांस्कृतिक ठेवा म्हणजे आपले अभिजात शास्त्रीय संगीत. आपल्या जिल्ह्यातही या शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार व्हावा, शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या जिल्ह्यातील युवा साधकांना हक्काचं व्यासपीठ मिळावं, त्यांची कला रसिकांसमोर आणुन त्यांच्या कलागुणांना न्याय द्यावा व त्यांना प्रोत्साहित करावं या पवित्र उद्देशाने ‘श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग’ व ‘स्वयंभू कला क्रीडा मंडळ आजगांव’ यांच्या संयुक्त विद्यमाने “राधाकृष्ण चषक २०२३” या सांगीतिक महोत्सवाचे आयोजन श्री देव वेतोबा मंदिर सभागृह, आजगाव ता. सावंतवाडी येथे करण्यात आले होते. या अंतर्गत ‘शास्त्रीय गायन(हिंदुस्तानी ख्याल) स्पर्धा’ व ‘सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा’ घेण्यात आली.

   महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच रविवार दि. ३० एप्रिल २०२३ रोजी सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा मर्यादीत ʼशास्त्रीय गायन(हिंदुस्थानी ख्याल) स्पर्धाʼ संपन्न झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन आजगांवचे युवा सामाजिक कार्यकर्ते अॅड स्वप्निल प्रभूआजगांवकर, आजगांव सरपंच सौ. यशश्री सौदागर, धाकोरे सरपंच सौ. स्नेहा मुळिक, पुणे येथील जयपूर घराण्याच्या विख्यात शास्त्रीय गायिका विदुषी मंजिरी आलेगावकर मॅडम, राधाकृष्णा संगीत साधनाच्या अध्यक्षा संगीत अलंकार सौ.वीणा दळवी, स्वयंभू कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री अण्णा झांट्ये, वेतोबा देवस्थानचे मानकरी श्री दादा प्रभूआजगांवकर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या 'शास्त्रीय गायन(हिंदुस्तानी ख्याल)' विभागात प्रथम पारितोषिक रोख ₹ ५५०१/- व 'राधाकृष्ण चषक'चा मानकरी ठरला रत्नागिरीचा चैतन्य विराज परब. द्वितीय पारितोषिक रोख ₹ ३५०१/- व सन्मानचिन्हची विजेती ठरली माणगांवची कु. पल्लवी संजय पिळणकर. तृतीय पारितोषिक ₹ २५०१/- व सन्मानचिन्हची विजेती ठरली रत्नागिरीची लीना विनोद खामकर. उत्तेजनार्थ प्रथम ₹१५०१/- अणसूर वेंगुर्लेचा हर्षल  सगुण मेस्त्री तर उत्तेजनार्थ द्वितीय ₹११०१/-ची विजेती ठरली आजगांव सावंतवाडीची कु. वैष्णवी दत्तप्रसाद प्रभू. शास्त्रीय संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व व जयपूर अत्रौली घराण्याच्या ख्यातनाम गायिका, पुणे येथील विदुषी मंजिरी आलेगावकर मॅडम यांनी या स्पर्धेचं परीक्षण केलं. यावेळी स्पर्धक व संगीत साधकांना सुंदर असं मार्गदर्शन त्यांनी केलं. पारितोषिक वितरण सोहळा माजी पं स. सदस्य श्री रुपेश राऊळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री एकनाथ नारोजी, आणि देवस्थानचे मानकरी आणि परिक्षक हस्ते करण्यात आला.

 या सांगीतिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवार दि. ०१ मे २०२३ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित "सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा" छोटा गट व मोठा गट अशी दोन गटात घेण्यात आली. या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सन्मा. श्री मनीषजी दळवी, सावंतवाडी संस्धानचे युवराज श्री लखमराजे भोसले, संगीतरत्न श्री भालचंद्र केळुस्कर बुवा, ज्येष्ठ रंगकर्मी वसंत उर्फ भाऊ साळगावकर, अॅड. दिलीप ठाकुर आदी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आलं. या सवेष नाट्यगीत गायन विभागात छोट्या गटातून प्रथम पारितोषिक रोख ₹ ३००१/- व 'राधाकृष्ण चषक' ची मानकरी ठरली वेर्ले सावंतवाडीची कु. वेदा प्रवीण राऊळ. द्वितीय पारितोषिक प्रत्येकी रोख ₹ १५०१/- व सन्मानचिन्ह आजगांवची कु. कनक दीनानाथ काळोजी व खारेपाटणची कु. प्राजक्ता अभय ठाकूरदेसाई यांना विभागून देण्यात आला. तृतीय पारितोषिक ₹१००१/-ची विजेती ठरली वेंगुर्लेची कु. गीता सोपान गवंडे. उत्तेजनार्थ प्रथम ₹७०१ विजेता ठरला तेंडोली भाविक गजानन मेस्त्री तर उत्तेजनार्थ द्वितीय साळगांवचा दुर्वांक ह्रदयनाथ गावडे व तुळस वेंगुर्लेची सानिका महादेव मेस्त्री यांना विभागून देण्यात आला.

सवेष साभिनय नाट्यगीत’ मोठ्या गटातून प्रथम पारितोषिक रोख ₹ ५००१/- व ‘राधाकृष्ण चषक’ची मानकरी ठरली आजगांव सावंतवाडीची कु. ममता दत्तप्रसाद प्रभू. द्वितीय पारितोषिक रोख ₹ ३००१ व सन्मानचिन्ह विजेता सातोसे सावंतवाडीचा कु. कौस्तुभ संतोष धुरी तर तृतीय पारितोषिक रोख ₹२००१/- व सन्मानचिन्हचा विजेता ठरला सांगेली सावंतवाडीचा सुरज रविश केरकर. निरवडे गावची कु. गौरी बाबू पारकर उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक ₹१००१ चा विजेती ठरली. तर उत्तेजनार्थ द्वितीय तळवडे सावंतवाडीचा प्रशांत प्रमोद काजरेकर आणि डोंगरपाल सावंतवाडीचा पारस विश्वनाथ गवस यांना विभागून देण्यात आला. या स्पर्धेचे परीक्षणही विदुषी मंजिरी आलेगावकर यांनीच केले. यावेळी निवेदक संजय कात्रे सर यांच्या माध्यमातून त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. या कार्यक्रमाचा पारितोषिक वितरण सोहळा शिवसेना जिल्हाप्रमुख श्री अशोकजी दळवी, तालुका प्रमुख श्री नारायण राणे, सरपंच सौ. यशश्री सौदागर, एकनाथ नारोजी, सन्मा. परिक्षक महोदया आणि श्री राधाकृष्ण संगीत साधनाच्या अध्यक्षा संगीत अलंकार सौ.वीणा दळवी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. अर्चना फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ अर्चना घारे-परब यांनीही भेट देवून स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. स्पर्धेसाठी स्पर्धकांना संगीत साथ, हार्मोनियम श्री साहिल घुबे, ऑर्गन श्री भालचंद्र केळुसकर बुवा तर तबला साथ गोवा येथील आदित्य तारी, श्री प्रसाद मेस्त्री, यांनी केली. दोन्ही दिवसाच्या संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय कात्रे सर यांनी केलं.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व “राधाकृष्ण चषक २०२३” हा सांगीतिक महोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व देणगीदार, पारितोषिकांचे सर्व प्रायोजक, कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्व सहभागी स्पर्धक, उपस्थित सर्व संगीतप्रेमी, स्पर्धेचे मान्यवर परीक्षक, श्री वेतोबा देवस्थानचे सर्व मानकरी, दोन्ही मंडळांचे सर्व सदस्य, श्री राधाकृष्ण संगीत साधनाचे सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक वर्ग या सर्वांचे ‘श्री राधाकृष्ण संगीत साधना’चे सचिव श्री हेमंत दळवी यांनी आभार मानले.

error: Content is protected !!