सिंधुपुत्राची रायगडवर सायकल स्वारी !

महाराजांना सायकलद्वारे अनोखा मुजरा, आदित्य जगदीश बटावलेचा अनोखा विक्रम, महादरवाजापर्यंत तब्बल १५०० पायऱ्या सायकल घेऊन सर, राईड फॉर मावळे #’डर के आगे मावळे हे’ ‘सायकल एडवेंचर राइड जर्नी’
कुडाळ ; राईड फॉर मावळे # ‘डर के आगे मावळे हे’ ही ‘सायकल एडवेंचर राइड जर्नी’ सिरीज सिंधुदुर्ग जिल्हयाचा सुपुत्र आदित्य जगदीश बटावले सुरु केली आहे. याद्वारे राज्यातील जमेल तेवढ्या गड-किल्ल्यांवर जाऊन पूर्ण तट सायकलने फिरून छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करणे हे आदित्यचे ध्येय आहे.
कुडाळ एमआयडीसी ओंकारनगर येथे राहणाऱ्या आदित्यने शनिवारी, २९ एप्रिल २०२३ रोजी रायगड किल्ल्याच्या महादरवाजापर्यंत जाऊन तब्बल १,५०० खडतर पायऱ्या चढून विक्रमी म्हणजे २ तास, २३ मिनिटे, २१ सेकंद या वेळेत चित्त दरवाजाने १५ किलोची सायकल महादरवाजापर्यंत नेऊन महाराजांना मानाचा मुजरा केला. या संपूर्ण प्रवासासाठी आदित्यला ‘अवधूत प्रोजेक्ट’चे जाधव आणि सायकलिंग क्षेत्रात ‘इन्स्पायर सायकल’ कुडाळचे रुपेश तेली आणि मित्र, हितचिंतक आणि आई-वडिलांचे सहकार्य मिळाले. आदित्यने मावळ्याचा वेश परिधान करून रायगड गाठून महाराजांना अनोखा मुजरा केला. गडावर जाताना आपल्यात तीच ऊर्जा होती जी शेवटपर्यंत कायम होती, असे आदित्य यावेळी म्हणाला.
सायकलला आजच्या काळातील घोडा मानला तर आपल्या खूप गोष्टी सोयीस्कर होतील. याच भावनेने आपण या सायकल रूपी घोड्याला महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड-किल्ल्यांवर घेऊन जाऊन नतमस्तक करावे हा या मागचा हेतू आहे असे आदित्य म्हणाला. आजच्या युवापिढीला आदित्यने सायकलचे महत्व पटवून देताना छत्रपतींचा इतिहासही पटवून दिला.
‘जिथे जाईल तिकडे सायकल’
आदित्य हा संत राऊळ महाराज, कुडाळ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असून तो राष्ट्रीय छात्र सेनेचे माजी कॅडेट आहे. इच्छाशक्ती असेल तर आपण काहीही करू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी मिळून इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्य उभे केले आणि त्यांच्या या इच्छाशक्तीची उदाहरणे म्हणजे आपले गड-किल्ले होत. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन आपण अनेक कामे करत असतो, अनेक प्रकारे चांगली कामे करून त्यांना आपण मुजरा देत असतो. अशाच प्रकारचा मुजरा आदित्य बटावले या युवकाने ‘जिथे जाईल तिकडे सायकल’ या उपक्रमाच्या माध्यमातून करत आहे. आदित्यचे सर्व गडांवरती सायकल घेऊन जाऊन संपूर्ण गड सायकलने फिरून पूर्ण करणे असे स्वप्न आहे.
रांगणाही केला सर
काही महिन्यांपूर्वी आदित्यने सिंधुदुर्ग किल्यावर जाऊन बुरुजावर तसेच संपूर्ण तट सायकलने फिरून आला. तसेच ८ जानेवारी २०२३ रोजी त्याने रांगणागडावरती नारुरमार्गे जाऊन गडाची खडतर आणि धोकादायक वाट पार करीत तसेच गडावरील जिकडे पायी जाताना भय वाटणारा असे एका बाजूला संपूर्ण खोल दरीची वाट पार करीत बुरुज, हत्ती सोंड माची (चिलखती बुरुज), केरवडा दरवाजा, उत्तर दरवाजा, पूर्व प्रवेशद्वार या खडतर ठिकाणी वाट काढत जाऊन एक नवीन विक्रम केला. येतानाही नारुरच्या दिशेने येणार्या खडकाळ वाटेनेच उतरला. रांगणा गडावरती सायकलने अशा खडतर वाटेने जाऊन संपूर्ण धोकादायक तट सायकलने फिरणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदित्य जगदीश बटावले हा पहिलाच युवक आहे.
आदित्यचा #Pedal क्रांती Bharat उपक्रम
आदित्यला सर्व किल्ले सायकलने फक्त जायचेच नाही तर संपूर्ण तट सायकलने पार करायचे आहेत. या अगोदर आदित्यने #Pedal क्रांती Bharat हा उपक्रम राबविला होता. या उपक्रमाचा उद्देश असा की, सायकल जनजागृती मोहिमेंतर्गत संपूर्ण जिल्हा फिरून शाळा, कॉलेजना भेट देऊन विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून प्रत्येक युवकांपर्यंत पोहचून सायकलबद्दल जनजागृती करणे होय. Pedal क्रांती Bharat या सायकल जनजागृती मोहिमेंतर्गत ९ डिसेंबर २०२२ ते २० डिसेंबर २०२२ पर्यंत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा सायकलने फिरून २५ ते ३० शाळा, कॉलेजना भेट देऊन विद्यार्थ्यांना सायकल चालवण्याबाबत, त्याचे फायदे, योग्य सायकल कोणती घ्यायची हे काही वेळेस कळत नसते. ज्यामुळे नंतर त्रास सहन करावा लागतो. तर तो त्रास टाळण्यासाठी प्रथमच सायकल निवडताना योग्य ती सायकल कशी घ्यायची व त्याचा उपयोग योग्यरित्या कसा करायचा याबाबत जनजागृती केली.
रोहन नाईक, कुडाळ