वैभव नाईक यांची पावशी आणि माणगाव येथे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

भातशेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी
अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
अपुऱ्या पावसामुळे आणि तीव्र उन्हाच्या झळांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्यातील पावशी आणि माणगाव येथे नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी केली.
राज्य सरकारने भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊनही सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्याप पंचनाम्यांना सुरुवात झालेली नसल्याबद्दल वैभव नाईक यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असताना सरकार या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नसल्याची टीकाही त्यांनी केली.
शासनाने तातडीने सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे पूर्ण करून सरसकट नुकसानभरपाई द्यावी. अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा वैभव नाईक यांनी यावेळी दिला.
पावशी येथे झालेल्या पाहणीवेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, बाळा पावसकर, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, माजी उपसभापती जयभारत पालव, पावशी उपसरपंच लक्ष्मीकांत तेली यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि शेतकरी उपस्थित होते.
माणगाव येथील कुंभारवाडीमध्ये शेतकरी पांडुरंग कुंभार यांच्या, तर कोठीची राई येथे हर्षद धुरी, सुभाष धुरी आणि उमेश देसाई यांच्या भातशेतीची पाहणी करण्यात आली. यावेळी शिवसेना तालुका संघटक बबन बोभाटे, पंचायत समिती सदस्य तथा गटनेते योगेश धुरी, माणगावच्या सरपंच मनीषा भोसले, उपसरपंच बापू बागवे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि शेतकरी उपस्थित होते.






