पटवर्धन सरांचा ज्ञानदानाचा झंझावाती दौरा.

कणकवली/मयुर ठाकूर
बदलापूर ,जिल्हा ठाणे येथे राहणारे इंग्रजी विषयाचे गाढे अभ्यासक सेवानिवृत्त प्राध्यापक व Learn to enjoy English या हा पुस्तकाचे लेखक सुहास पटवर्धन महाराष्ट्रातील दुर्गम भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेच्छेने विनामूल्य मार्गदर्शन करीत असतात. अलीकडेच एक दिवस त्यांनी संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावाच्या परिसरातील घाटीवळे कदमवाडी येथील ५ वी ते ७ वी च्या वीस विद्यार्थ्याना सकाळी आठ ते नऊ त्यानंतर देवळे हायस्कूल मधील ५वी ते ९ वी च्या एकूण सत्तर विद्यार्थ्याना१० ते ११या वेळेत तर त्यानंतर लगेच तेथून सहा किमी अंतरावरील रत्नागिरी जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ देवळे या शाळेला भेट देऊन तेथील ५ वी ते ७ च्या एकूण तीस विद्यार्थ्याना साडेअकरा ते साडे बारा पर्यंत इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन केले. पाच तासात दुर्गम ग्रामीण भागातील तीन शाळांना एकाच दिवशी भेट देणाऱ्या पटवर्धन सरांचे ग्रामस्थांनी कौतुक केले. घाटीवळे कदमवाडी शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक श्री. मोघे सर यांनी विशेष परिश्रम घेऊन पटवर्धन सरांच्या दौऱ्याचे नियोजन केले होते. स्थानिक ग्रामस्थ सरपोतदार यांनी पटवर्धन सरांच्या राहण्याची व भोजनाची उत्तम व्यवस्था केली होती.