संविधानाचे मोल जपणे ही सामूहिक जबाबदारी -डॉ.सोमनाथ कदम

कणकवली भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथील विषमतावादी व्यवस्था उध्वस्त केली. धर्मनिरपेक्षता,समाजवादी, कल्याणकारी ,लोकशाही, गणराज्याची स्थापना करणारे सर्वोत्कृष्ट संविधान साकारले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर संविधान हीच भारतातील दुर्बल, अल्पसंख्यांक आणि उपेक्षित समाजासाठीचे तारणहार आहे. त्यामुळे संविधानाचे मोल जपणे ही प्रत्येक भारतीयांची सामूहिक जबाबदारी ठरते’असे प्रतिपादन लेखक आणि संशोधक डॉ.सोमनाथ कदम यांनी केले.
सावंतवाडी तालुक्यातील सातार्डे येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन सभेत म्हणून वक्ते डॉ. सोमनाथ कदम उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी सौ. मोहिनी जाधव होत्या तर मंचावर सरपंच संदीप प्रभू, पोलीस पाटील विनिता मयेकर, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदीप राऊळ, उदय पारिपत्ये, ग्राम पंचायत सदस्य मिलिंद जाधव, आनंद सातार्डेकर,संतोष जाधव उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. सोमनाथ कदम म्हणाले की,” डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही शोषित, दलित, वंचित, ओबीसी, घटकांच्या मानवतावादी हक्कासाठी होती. केवळ एका जाती च्या उत्थानासाठीची ती चळवळ नव्हती. शेतकरी, कामगार आणि महिलांच्या उन्नतीसाठी बाबासाहेबांचा लढा होता.”
यावेळी कवयित्री प्रा.सुचिता गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी सादर केलेल्या भीमरावाच्या ओवीला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.
‘डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात रमाई चे स्थान अलौकिक असे आहे.अत्यंत कष्टातून रमाईने भिमाचा संसार फुलविला. बाबासाहेबांचा संसार कसा होता हे कळण्यासाठी भीमा- रमा पत्र संवाद समजून घेणे महत्त्वाचे आहे . आज प्रत्येक स्त्रीने रमाईचा आदर्श घेतला पाहिजे’ असे मत यावेळी प्रा. सुचिता गायकवाड यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक तसेच उत्कृष्ट व्यावसायिक स्त्री पुरुषांचा मानवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अभिवादन सभेचे सूत्रसंचालन आनंद जाधव यांनी केले व शेवटी आभार प्रदर्शन गणपत जाधव यांनी केले. या कार्यक्रमास सावंतवाडी तालुक्यातील तसेच गोव्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कणकवली /मयुर ठाकूर