फळपिक विमा योजनेतील वंचित शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने 10 ऑगस्ट रोजी होणार बैठक
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती
पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना 2025-26 मधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही शेतकरी तांत्रिक त्रुटीमुळे भरपाई पासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री नितेश राणे यांनी 10 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता त्यांच्या मंत्रालयातील दालनात महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले असल्याची माहिती जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली.
तांत्रिक त्रुटीमुळे जिल्ह्यातील शेतकरी अनुदानापासून वंचित असल्याबाबत श्री सावंत यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधले होते. तसेच या अनुषंगाने उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून हा विषय मार्गी लावण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या दालनात सदरची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला कृषी सचिव कृषी, आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच भारतीय कृषी विमा कंपनी नवी दिल्ली यांचे मुख्य महाव्यवस्थापक लावण्या मुंडयूर, कृषी प्रक्रिया व नियोजन संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच सीएससी महाराष्ट्राचे मुख्य व्यवस्थापक वैभव देशपांडे, भारतीय कृषी विमा कंपनीचे व्यवस्थापक अनिल कुंभारे, स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीषा दळवी, माजी जि प अध्यक्ष सतीश सावंत व अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत






