नामवंत उद्योगपती अनिल पाटोदिया यांची जिव्हाळा सेवाश्रमाला सदिच्छा भेट

सेवाभावी कार्याचे केले भरभरून कौतुक

बाईक हॉस्पिटॅलिटी लिमिटेडचे संस्थापक तथा देशातील नामवंत उद्योगपती अनिल पाटोदिया आणि त्यांच्या पत्नी सौ. अर्चना पाटोदिया यांनी जिव्हाळा सेवाश्रमाला सदिच्छा भेट देऊन संस्थेच्या सेवाभावी कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले. यावेळी त्यांनी सेवाश्रमातील विविध उपक्रमांची माहिती घेत लाभार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
देशातील सुमारे १५ प्रमुख शहरांमध्ये आलिशान हॉटेल्सचे यशस्वी जाळे उभारणारे श्री. पाटोदिया हे उद्योगविश्वातील एक मान्यवर व्यक्तिमत्त्व आहेत. व्यावसायिक यशाबरोबरच सामाजिक बांधिलकी आणि आध्यात्मिक मूल्यांची जपणूक हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य मानले जाते. त्यांच्या कुटुंबातील सदस्य विविध उद्योग-व्यवसायांमध्ये कार्यरत असून अनेक उद्योगांचा विस्तार जागतिक स्तरावर झाला आहे. त्यांच्या सहचारिणी सौ. अर्चना पाटोदिया या देखील विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत समाजसेवेत मोलाचे योगदान देत आहेत.
जिव्हाळा सेवाश्रमात निराधार, ज्येष्ठ नागरिक आणि गरजूंसाठी राबविण्यात येणाऱ्या सेवाकार्याची माहिती घेतल्यानंतर श्री. व सौ. पाटोदिया यांनी संस्थेच्या कार्याचे मनापासून अभिनंदन केले. समाजातील वंचित घटकांसाठी निःस्वार्थ भावनेने सुरू असलेले हे कार्य प्रेरणादायी असून अशा सेवाभावी संस्थांना समाजातील सर्व स्तरांतून सहकार्य मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
भेटीदरम्यान संस्थेच्या वतीने श्री. अनिल पाटोदिया यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनीही जिव्हाळा सेवाश्रमाच्या कार्याचे कौतुक करत संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
इतके मोठे उद्योगपती असूनही अनिल पाटोदिया आणि सौ. अर्चना पाटोदिया यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा, नम्रता आणि अध्यात्माप्रती असलेली श्रद्धा उपस्थितांना विशेष भावली. भेटीदरम्यान ते वारंवार ईश्वराचे स्मरण करत होते. गोमातेप्रती असलेले त्यांचे प्रेम, दयाभाव आणि प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधण्याची त्यांची शैली उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेली. भविष्यातही सेवाश्रमाच्या कार्याशी जोडलेले राहून पुन्हा भेट देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे अध्यक्ष सुरेश बिर्जे यांनी उपस्थितांचे आभार मानले. जयप्रकाश प्रभू यांनी सूत्रसंचालन केले. या भेटीचे आयोजन घडवून आणण्यासाठी मोहन आरावंदेकर यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांमुळे जिव्हाळा सेवाश्रमात उद्योग, समाजसेवा आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम अनुभवण्याची संधी लाभली.

error: Content is protected !!