दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाची दैना; साधे रक्तस्त्राव थांबवण्याचे उपचारही मिळेनात, रुग्णांवर थेट मणिपालमध्ये उपचाराची वेळ!

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष कृष्णा यशवंत धाऊसकर (रा. सासोली) यांनी दोडामार्ग येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील अत्यंत भोंगळ आणि निष्काळजी कारभाराचा पर्दाफाश केला आहे. रविवारी संध्याकाळी गवत कापण्याच्या कटरचे ब्लेड तुटून धाऊसकर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती व त्यांचा मुख्य शिरेला इजा झाल्याने प्रचंड रक्तस्त्राव होत होता. अशा आणीबाणीच्या प्रसंगी त्यांना तातडीने दोडामार्ग येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र, दोडामार्ग रुग्णालयाची दुरवस्था इतकी पराकोटीला पोहोचली आहे की, तिथल्या कर्मचाऱ्यांना आणि डॉक्टरांना हा साधा रक्तस्त्राव कसा थांबवावा याचेही तंत्र अवगत नव्हते. तसेच त्याकरिता लागणारी कोणतीही तातडीची वैद्यकीय साधनसामग्री तिथे उपलब्ध नव्हती, असा संतापजनक आरोप धाऊसकर यांनी केला आहे.यामुळे त्यांना गोव्यातील
बांबोळी आणि आजुलो रुग्णालयात धाव घ्यावी लागली.
दोडामार्ग येथील प्राथमिक उपचारात अपयशी ठरल्यानंतर धाऊसकर यांना आजुलो (म्हापसा) येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. परंतु, शासकीय रुग्णालयांमध्ये (आजुलो व बांबोळी) रुग्णवाहिकेतून किंवा योग्य प्रक्रियेने न आल्यास रुग्णांची प्रचंड हेळसांड केली जाते आणि ‘डोन्ट केअर’ (निष्काळजीपणाची) भूमिका घेतली जाते.असा कटू अनुभव त्यांना आला. सततच्या रक्तस्त्रावामुळे परिस्थिती अधिक गंभीर होत चालल्याने शेवटी शासकीय व्यवस्थेवरचा विश्वास उडून त्यांनी थेट खासगी मणिपाल रुग्णालयात धाव घेतली. तिथे रात्रीतून तातडीने शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी त्यांचा जीव वाचवला.लोकप्रतिनिधींच्या केवळ ‘फोटो सेशन’वर नागरिकांचा संताप व्यक्त होत आहे.काही दिवसांपूर्वीच स्थानिक लोकप्रतिनिधींनी या रुग्णालयाच्या इमारतीचे आणि नवीन कामांचे मोठे ‘फोटो सेशन’ करून प्रसिद्धी मिळवली होती. मात्र, प्रत्यक्षात इमारती चकाचक असल्या तरी आतमध्ये रुग्णांना साधे प्राथमिक उपचारही मिळत नसतील, तर या प्रसिद्धीचा आणि टक्केवारीच्या राजकारणाचा काय फायदा? असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.धाऊसकर सध्या मणिपाल रुग्णालयात उपचार घेत असून शुक्रवारपर्यंत त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. या गंभीर प्रकारानंतर दोडामार्ग रुग्णालयातील भोंगळ कारभाराविरोधात आणि डॉक्टरांच्या वृत्तीविरोधात लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा आणि पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाला जाब विचारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.





