कुडाळात २७ जूनला ‘श्री शिवराज्याभिषेक सोहळा’

इतिहास संकलन समिती आणि शिवप्रेमी सिंधुदुर्ग यांचे आयोजन
विवेक पंडित आणि संध्या तेरसे यांची माहिती
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाची प्रचिती देणारा, ३५२ वर्षांपूर्वीचा शिवराज्याभिषेक सोहळा पुन्हा एकदा याची देही याची डोळा पाहता येणार आहे. इतिहास संकलन समिती कोकण प्रांत आणि शिवप्रेमी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने, येत्या २७ जूनला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी रोजी कुडाळ येथील मराठा समाज हॉलमध्ये ५० कलाकारांच्या संचात एका भव्य-दिव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याच आयोजन करण्यात आल्याची माहीती संयोजक विवेक पंडित आणि संध्या तेरसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक आणि लेखक तथा इतिहास संकलन समितीचे उपाध्यक्ष रविराज पराडकर यांच्या ओघवत्या वाणीतून उलगडणारा राज्याभिषेक सोहळ्याचा इतिहास हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य असणार आहे.
इतिहास संकलन समिती कोकण प्रांत आणि शिवप्रेमी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याविषयी माहिती देण्यासाठी आज आज सायंकाळी येथील एमआयडीसी विश्रामगृहावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संयोजक विवेक पंडित, संध्या तेरसे, राजू राऊळ, बंड्या सावंत, डॉ. कमलेश चव्हाण, डॉ. बापू भोगटे, शिवम म्हाडेश्वर, रमाकांत नाईक आदी उपस्थित होते.
श्री. पंडीत म्हणाले, या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे ३५२ वर्षांपूर्वी रायगडावर झालेला शिवराज्याभिषेक सोहळा जसाच्या तसा या कार्यक्रमात उभा केला जाणार आहे. त्या काळातील प्रमुख सरदार आणि उमरावांच्या उपस्थितीचे हुबेहूब सादरीकरण येथे पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, ज्यांनी रायगडावर पहिल्यांदा तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात केली, ते इतिहास संकलन समिती कोकण प्रांताचे उपाध्यक्ष रवीराज पराडकर स्वतः उपस्थित राहून
उपस्थितांना त्या ऐतिहासिक गाथेची रंजक माहिती देणार आहेत.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ डॉ. अरविंद जामखेडकर यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष म्हणून हेमंत मुजुमदार जबाबदारी सांभाळणार आहेत. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि स्थानिक आमदार निलेश राणे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा आणि प्रत्येक शिवप्रेमीला अभिमानाचा अनुभव देणारा ठरणार आहे. तरी, तमाम शिवप्रेमींनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शनिवार, २७ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता मराठा समाज हॉल, कुडाळ येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
संध्या तेरसे म्हणाल्या, ह्या चित्ताकर्षक कार्यक्रमात सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक रविराज पराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पन्नासहून अधिक स्थानिक कलाकार शिवराजाभिषेकाचा रंगमंचीय आविष्कार सादर करणार असून पराडकरांच्या अमोघ वाणीतून शिवराजाभिषेकमिमांसा जाणून घेण्याचा लाभ उपस्थित शिवप्रेमींना मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिन्दू साम्राज्य दिनाचा असा भव्य सोहळा प्रथमच होत असून इथल्या लोकांना ह्या कार्यक्रमाद्वारे नेत्रदीपक ऐतिहासिक शिवराजाभिषेक सुवर्णक्षण प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. या नेत्रदीपक कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन संध्या तेरसे यांनी केले आहे.





