….तर पिंगुळी सरपंचानी ग्रामस्थांसोबत उपोषणात सहभागी व्हावे !

पाझर तलाव प्रश्नी पिंगुळी ग्रामस्थ १ मे रोजी उपोषणावर ठाम

सरपंचांच्या राजीनाम्याची केली मागणी

पिंगुळी पाझर तलाव प्रश्नी सरपंच गावासोबत असतील तर त्यांनी आम्ही जे एक मे रोजी उपोषण करणार आहोत त्यामध्ये लोकांसोबत सहभागी व्हावे नाहीतर सरपंचानी राजीनामा द्यावा अशी मागणी पिंगुळी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम उर्फ गुरु सडवेलकर आणि ग्रामस्थांनी यांनी केली आहे. बुधवारी सायंकाळी एमआयडीसी विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत सडवेलकर बोलत होते. पाझर तलावाच्या भोवती विकासकामार्फत २७५ सदनिकांचा प्रकल्प होणार असून त्यामुळे सांडपाणी जाऊन पाझर तलावाचे पाणी भविष्यात दूषित होऊ शकते. त्याविरोधात एक मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याच्या भूमिकेवर आपण ठाम असून पिंगुळी ग्रामस्थांनी मोठया संख्यने या उपोषणात सहभागी व्हावे असे आवाहन देखील श्री. सडवेलकर यांनी केले आहे.
जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांनी पिंगुळी ग्रामस्थांसह याबाबत बुधवारी सायंकाळी कुडाळ एमआयडीसी विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, ग्रा.प. सदस्य तुळशीदास पिंगुळकर, चैतन्य खानोलकर, मिलिंद परब, दीपक राऊळ, चेतन राऊळ, अनंत धुरी, निरंजन राऊळ, दीपक गावडे, बाबाजी दळवी, वामन राऊळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी श्री. सडवेलकर म्हणाले, पिंगुळी पाझर तलावाचा प्रश्न पिंगुळीवासियांच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. पिंगुळीचा विकास झपाट्याने होत आहे त्यामुळे अनेक विकासक पिंगुळीत येत आहेत. त्यातच तिन्ही बाजूने डोंगरांनी वाढलेल्या पिंगुळीच्या पाझर तलाव परिसरात २७५ सदनिकांचा प्रकल्प होत आहे. या पाझर तलावाचा सर्वे नंबर २९ असून त्याचे क्षेत्र ४.२३ हेक्टर व २० आर एवढे आहे. तर हा जो प्रकल्प आहे तो पाझर तलावाच्या भोवती सर्वे नंबर २८-१ आणि २८-२ या मध्ये एकूण २५ एकर क्षेत्रात होत आहे. या सदनिकांमुळे जे सांडपाणी होणार ते साहजिकच तलावाच्या दिशेने जाणार आणि तलावाचे पाणी दूषित होणार. या तलावावर पिंगुळी ग्राम पंचायतीची नळपाणी पुरवठा योजना आहे. त्याचे ३ हजार ग्राहक आहेत. १० ते १५ हजार ग्रामस्थांना याचा पाणी पुरवठा होतो. तसेच प्रकल्प बांधकाम करते वेळी जमिनीची उलथापालथ होऊन माती तलावात जाणार आहे. पावसात हा धोका जास्त आहे.
तसेच पिंगुळी पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या रोपोर्ट नुसार या प्रकल्पामुळे नळपाणी योजनेचे नुकसान होऊ शकते. तसेच पिंगुळी नळ पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या वीज वाहिनीतून विकासकाने कोणतीही पूर्वपरवानगी ना घेता वीज कनेक्शन घेतले आहे. नळ योजनेची पाईपलाईन सुद्धा उघडी पडलेली आहे. माती वाहून तलावाच्या पाण्यात जाऊन तलावाची पाणी साठवण क्षमता कमी होणार आहे. तसेच त्या तलावामध्ये विकासकामार्फत बोटिंगची सुविधा केली जाणार आहे, अशा प्रकारचा रिपोर्ट पिंगुळी ग्राम पंचायतच्या नळ पाणी योजनेच्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. त्याची प्रत सडवेलकर यांनी यावेळी सादर केली.
श्री. सडवेलकर यांनी पुढे सांगितले, तलावाच्या सभोवतालची सर्व जमीन विकासकाच्या मालकीची असल्याने भविष्यात नळ पाणी योजनेचे जीर्ण पाईपलाईन बदलणे, आवश्यकतेनुसार नवीन पाईपलाईन टाकणे, याकरिता कोणताही मार्ग राहणार नाही. तलावाची मालकी कागदोपत्री शासनाची राहील, परंतु अधिकार आणि कब्जा हा खाजगी विकासकाचा राहणार आहे, ही बाब पिंगुळी गावाच्या दृष्टीने घातक असून, झपाट्याने विकास होणाऱ्या पिंगुळी गावाला भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे, हे निश्चित आहे.
प्रकल्पासाठी ज्यावेळी मोजणी झाली त्यावेळी लगतच्या पाझर तलावाची मालकी असलेल्या जिल्हा परिषदेला कोणतीही पूर्वसूचना दिलेली नसल्याचे पुरावे श्री. सडवेलकर यांनी यावेळी सादर केले. ग्रामपंचायतीने विकासकाला एनओसी देण्यासाठी १३ मे २०२५ ला जी बैठक घेतली त्या बैठकीला १७ सदस्यांपैकी १३ सदस्य उपस्थित होते. पण सरपंचानी अलीकडेच जी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यातील केवळ तीनच सदस्य उपस्थित होते. उपसरपंच उपस्थित नव्हते, याकडे श्री. सडवेलकर यांनी लक्ष वेधले. तसेच ज्यावेळी एनओसी दिली त्याला सूचक अनुमोदक नसल्याचा पुरावाच श्री. सडवेलकर यांनी सादर केला. अशा प्रकारची एनओसी ताबडतोब रद्द व्हाव्ही अशी आमची मागणी असल्याचे श्री. सडवेलकर यांनी सांगितले.
या पाझर तलाव प्रश्नी कोणत्याही प्रकारचे पक्षीय राजकारण नाही. गावच्या विकासासाठी आम्ही एकत्र आहोत. हे लोकांचे आंदोलन आहे. सरपंच जर आपण गावासोबत आहोत असे म्हणत असतील तर त्यांनी आमच्या १ मे रोजी होणाऱ्या उपोषणात सहभागी व्हावे असे आवाहन श्री. सडवेलकर यांनी शेवटी केले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी देखील पिंगुळी सरपंचांच्या भूमिकेवर संताप व्यक्त करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

error: Content is protected !!