एमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी मरणच झालेय महाग !

स्मशानभूमीसाठी पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनी बसणार उपोषणाला

मागण्या मान्य झाल्या नाहीतर आत्मदहनाचा निर्वाणीचा इशारा

कुडाळ तालुक्यातील नेरूर-वाघचौडीवाडी येथील एमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकरी गेली २५ वर्षे त्यांना स्मशानभूमी मिळावी आणि ओएस-९च्या बॉर्डरने जोडरस्ता मिळावा यासाठी एमआयडीसी प्रशासनाशी पत्रव्यववहार करत आहेत. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन, महाराष्ट्र दिन यादिवशी गेली पाच-सहा वर्षे सातत्याने उपोषणे करत आहेत, पण त्यांच्या या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे यंदाच्या १ मे या महाराष्ट्रदिनी हे प्रकल्पग्रस्त शेतकरी पुन्हा एकदा आपल्या या मागण्यांसाठी कुडाळ येथील एमआयडीसी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान मागण्या मान्य झाल्या नाहीत तर समशानभूमीसाठी जो भूखंड मागणी करण्यात आला आहे, त्या ठिकाणी जाऊन आत्मदहन करण्याचा निर्वाणीचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.
एमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी मरणच आता महाग झाले आहे. त्यांची जी स्मशानभूमी आहे, त्याठिकाणी झाडीझुडपे आहेत. कोणाला अंत्यविधीसाठी तिथे घेऊन जाणे म्हणजे मोठी कसरत आहे. त्यासाठी गेली २५ वर्षे हे प्रकल्पग्रस्त शेतकरी स्मशानभूमीसाठी भूखंड देण्याची मागणी एमआयडीसी प्रशासनाकडे करत आहेत. या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केवळ ३५ रुपये गुंठा दराने आपल्या जमिनी एमआयडीसीसाठी दिल्या आहेत. त्यावेळी बरीच आश्वासने त्यांना देण्यात आली होती.
या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी चांगला रस्ता नाही त्यासाठी या प्रकल्पग्रस्तांनी बाजूलाच असलेल्याआणि गेली ५० वर्षे मोकळ्या असलेल्या डी-३९ या भूखंड मधील तीन गुंठे जमीनीची मागणी केली आहे. त्यासाठी गेली पाच वर्षे हे शेतकरी प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन, महाराष्ट्र दिन यादिवशी कुडाळ एमआयडीसी कार्यालयासमोर उपोषणे करत आहेत. पण दरवेळी प्रशासनाकडून त्यांच्या तोंडाला पाने पुसायचे काम होत आहे.
यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी सुद्धा हे प्रकल्पग्रस्त शेतकरी कुडाळ एमआयडीसी कार्यलयासमोर उपोषणाला बसले होते. त्यावेळी एमआयडीसी प्रशासनाने, ”आपली मागणी मुख्यालयाकडे पाठविण्यात आली असून मुख्यालयाच्या मंजुरी झाल्यावर रस्ता व स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करणेची कार्यवाही करण्यात येईल”, असे पत्र देखील क्षेत्र व्यवस्थापक यांच्याकडून दिले गेले होते. पण आज तीन महिने होऊनही प्रकल्पग्रस्तांची मागणी पूर्ण झालेली नाही. याबाबत या शेतकऱ्यांनी ५ मार्च २०२६ ला देखील पत्र दिले होते. पण अजूनही त्यांची मागणी पूर्ण झालेली नाही. याशिवाय यंदा २६ जानेवारीला खासदार नारायण राणे यांनी देखील या मागणीच्या पूर्ततेबाबत एमआयडीसी प्रशासनाला पत्र दिले होते. पण त्या पत्राची दखल सुद्धा एमआयडीसी प्रशासनाने घेतली नसल्याचे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
स्मशानभूमी बरोबरच ओएस-९च्या बॉर्डरने जोडरस्ता मिळावा अशी देखील या शेतकऱ्यांची मागणी आहे. ती देखील अजून पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या दोन्ही मागण्यांसाठी हे नेरूर-वाघचौडी, गोंधीयाळे भागातील प्रकल्पग्रस्त शेतकरी पुन्हा एकदा महाराष्ट्रदिनी कुडाळ एमआयडीसी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत. तसे पत्र त्यांनी एमआयडीसीच्या रत्नागिरी येथील प्रादेशिक अधिकाऱ्यांना दिले आहे. दरम्यान यावेळी मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मात्र जिथे स्मशानभूमी हवी आहे त्या डी-३९ या मोकळ्या भूखंडात जाऊन आत्मदहन करण्याचा निर्वाणीचा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकरी श्याम गावडे आणि इतर प्रकल्पग्रस्त शेतकरी यांनी दिला आहे. या पत्राच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, कुडाळ तहसीलदार, कुडाळ पोलीस ठाणे, मुख कार्यकारी अधिकारी एमआयडीसी अंधेरी मुंबई आणि उपअभियंता उपविभाग, कुडाळ एमआयडीसी यांना देण्यात आल्या आहेत.

error: Content is protected !!