भारतीय एकत्र कुटुंब पद्धती जगात श्रेष्ठ – डॉ. सोमनाथ कदम

भारतीय कुटुंब पद्धती ही जगात श्रेष्ठ आहे त्यामुळे मुलांवर चांगले संस्कार होतातच पण वृद्ध दिव्यांग आजारी व्यक्ती यांना कुटुंबात सामावून घेतले जाते. भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य असे की ते स्वतः पेक्षा इतरांच्या सुखाचे जास्त विचार करतात. त्यातूनच आनंद मिळवला जातो असे उद्गार ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरा पंचक्रोशीच्या वार्षिक मेळाव्यात कणकवली कॉलेजचे प्राध्यापक डॉ. सोमनाथ कदम यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरा पंचक्रोशी चा वार्षिक मेळावा नयनरम्य अशा आचरा समुद्रकिनारी वसलेल्या ऐश्वर्य रिसॉर्ट येथे अध्यक्ष अशोक कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. डॉ. सोमनाथ कदम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांच्या सोबत सुरेश गावकर, जे एम फर्नांडिस, बाबाजी भिसळे, सुरेश ठाकूर, मनाली फाटक, प्रकाश पेडणेकर, ऐश्वर्य रिसॉर्ट च्या मिताली कोरगावकर, आदी सह बहुसंख्येने जेष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. कदम
म्हणाले की जेष्ठ ने सुखी व आनंदी जीवनातील तरुणांच्या संसारात ढवळाढवळ करू नये गरज पडली व विचारले तरच त्यांना मार्गदर्शन करायचे पूर्वीपेक्षा आता कुटुंबात बदल होताना दिसतात असे मत व्यक्त केले. या मेळाव्यात मार्च महिन्यात ज्या सभासदांचे वाढदिवस होते त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान करत शुभेच्छा देण्यात आल्या.
पाच ज्येष्ठ नागरिकांनी संघाचे सभासदत्व स्वीकारले त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. वायंगणी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक व ज्ञानदीप वाचनालय वायंगणी चे अध्यक्ष प्रकाश पेडणेकर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. दुस-या सत्रात आमच्या वेळच्या कविता हा जेष्ठ भगिनींनी सादर केलेला कविता गायनाचा कार्यक्रम झाला. याचे नेतृत्व प्राजक्ता खोत यांनी केले. संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी यांच्या मार्गदर्शनाखाली योगाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. संघाच्या सभासदांनी 36 योगासनांचे प्रकार दाखवण्यात आले. संघाचे विशेष मार्गदर्शक बाबाजी भिसळे यांनी प्रस्तावित केले. कार्यवाहक जे एम फर्नांडिस यांनी अहवाल वाचन केले कार्य वृत्तांत सुरेश ठाकूर यांनी सादर केला. महिला आघाडी प्रमुख मनाली फाटक यांनी आभार मानले .
या मेळाव्याला संघाचे 98 सभासद उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विनामोबदला जागा, भोजन व्यवस्था करुन देणा-या ऐश्वर्य रिसॉर्ट च्या मिताली कोरगावकर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.





