मुंबई-गोवा महामार्गावरील हातिवले टोलनाका आज सकाळपासून सुरू

छोट्या गाड्यांसाठी मोजावे लागणार तब्बल ९० रुपये, तर छोट्या गाड्यांच्या रिटर्न जर्नीसाठी मोजावे लागणार १३० रुपये

राजापूर ; मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि सुट्टीसाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या खिशावर आता लोड पडणार आहे. कारण महामार्गावरील राजापूर तालुक्यातील म्हणजेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या बॉर्डरवरील हातिवले हा टोलनाका आजपासून सुरू करण्यात आला आहे. आज सकाळपासून या ठिकाणी टोलवसुली सुरू झाली असून NHAI ने या टोलवसुलीला परवानगी दिली आहे.
हातिवले टोलनाक्यावरती टोलवसुलीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सिग्नल यंत्रणाही बसवण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी आणि स्थानिकांनी विरोध करत टोलानाका सुरू करण्याचा प्रयत्न हाणून पडला होता. महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलवसुली करून देणार नाही, अशी भूमिका सर्वपक्षीय राजकीय नेते व नागरिकांनी घेतली होती. यावेळी झालेले आंदोलन हे भाजपचे नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वात झाले होते. पण त्यानंतर देखील आता या ठिकाणी टोलवसुली सुरु झाली आहे. त्यामुळे सुरू झालेल्या टोलनाक्याला विरोध होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी मुंबई-गोवा हायवेची पाहणी देखील केली. त्यानंतर झालेल्या बैठकीत गडकरी यांनी टोल सुरू करण्यासंदर्भात निर्देश दिले. त्यानंतर NHAI यांनी आम्हाला टोल सुरू करण्यासंदर्भात आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसारच आम्ही टोल वसुलीला सुरुवात केलेली आहे, अशी माहिती टोल कंत्राटदार आणि NHAI च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

प्रतिनिधी, राजापूर

error: Content is protected !!