…तर सर्वस्वी MNGL कंपनी जबाबदार !

कुडाळ न. पं. ची MNGL ला कडक नोटीस
भाजपा नगरसेवक, शिवप्रेमी नागरिक तसेच स्थानिक रहिवासी यांच्या वतीने कुडाळ मुख्याधिकारी यांच्याकडे केलेल्या लेखी मागणीनुसार MNGL कंपनीला कुडाळ नगर पंचायतने प्रत्यक्ष पहाणी करुन सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे संपूर्ण कुडाळ शहरात MNGL चे काम करताना नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये व खोदाई केलेली त्वरित पुर्ववत करुन देण्यात द्यावी असे लेखी आदेश कुडाळ नगर पंचायतचे मुख्याधिकारी यांनी MNGL यांना दिले आहेत. तसेच कंपनीच्या बेजबाबदार कामांमुळे कोणतीही वित्तहानी किंवा जीवितहानी झाली तर त्याला MNGL कंपनी जबाबदार असेल असा थेट इशाराच या पत्राद्वारे नगर पंचायतने MNGL कंपनीला दिला आहे.
या पत्रात म्हटले आहे, वायू वाहिन्याव्दारे घरोघरी नैसर्गिक वायू पुरविण्यासाठी जमीनीखालून पाईपलाइन टाकणेसाठी खोदकाम करणेसाठी MNGL कंपनीला अटी / शर्थीस अनुसरुन परवानगी देण्यात आलेली आहे. नगरपंचायत क्षेत्रामध्ये जमीनीखालून पाईपलाइन टाकणेसाठी खोदकाम केलेले रस्ते पुणर्भरण करणेबाबत कंपनीला नगरपंचायतीकडून वारंवार नोटिसा देण्यात आलेल्या आहेत.
काही ठिकाणी रस्ते पुणर्भरण केले जात आहेत. परंतू नगरपंचायत हद्दीतील ठरावीक ठिकाणचे रस्ते पाइपलाईन टाकल्यानंतर व्यवस्थितरित्या पूर्ववत केले जात नसल्याने अश्या प्रकारच्या कामामुळे पादचारी व बाहनधारकांना रस्त्यावरुन प्रवास करणे धोकादायक बनले जाते. तरी टप्प्या टप्प्याने ज्या ठिकाणी खोदाई केली जाते त्या ठिकाणी मुरूम दबाई करुन पृष्ठभाग समतोल करावा.
नगरपंचायत हद्दित नागरीकाची तसेच इतर शहरातील व खेड्यातील लोकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरु असते. नगरपंचायत हद्दित वायू वाहिन्याव्दारे घरोघरी नैसर्गिक वायू पुरविण्यासाठी जमीनीखालून पाईपलाइन टाकणेसाठी खोदकाम केल्यानंतर त्या ठिकाणी खोदलेले रस्ते पुणर्भरण न केल्यामुळे कोणत्याही प्रकारची जिवीत अगर वित्त हानी उद्भवू नये या करीता योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, तसे न केल्यास व कोणतीही जिवीत अगर वित्त हानी उद्भवल्यास त्यास सर्वस्वी MNGL कंपनी जबाबदार असेल, याची नोंद घ्यावी. नगरपंचायत हद्दित पाईपलाइन टाकणेसाठी खोदकाम करणेपूर्वी कुडाळ नगर पंचायत कार्यालयाकडील पाणीपुरवठा विभाग, विद्युत विभाग व बांधकाम विभाग यांना पुर्वसुचना देवून या कार्यालयाशी समन्वय ठेवून काम करावे, असे या पत्रात म्हटले आहे.





