राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत लोकजीवन समजून घ्या – प्रफुल्ल वालावलकर

बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या एनएसएस शिबिराचा नेरूर येथे शुभारंभ
राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत समाजात वावरत असताना तेथील लोक जीवन समजून घ्या. राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराच्या रूपाने निसर्गात, लोकांमध्ये मिसळण्याची सुवर्णसंधी चालून आलेली आहे तिचा लाभ घ्या. आजच्या पिढीमध्ये श्रमप्रतिष्ठा लोकपावत असताना अशा शिबिरांचे आयोजन हे उत्तम गोष्ट आहे. त्यात कोणतेही काम दुय्यम समजू नका. असे प्रतिपादन कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी केले. बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी श्रमसंस्कार शिबिराचा नेरूर येथे शुभारंभ झाला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री. वालावलकर बोलत होते.
बॅ नाथ पै नर्सिंग महाविद्यलायचे राष्ट्रीय सेवा योजना निवासी श्रमसंस्कार शिबिराचे नेरूर येथे आयोजन करण्यात आले होते. त्या शिबिराचे उदघाटन कुडाळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. यावेळी प्रफुल्ल वालावलकर यांच्यासह नेरूर सरपंच, भक्ती घाडीगावकर, नेरूरचे उपसरपंच दत्ताराम म्हाडदळकर, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्पना भंडारी, प्राचार्य अरुण मर्गज, प्रा. नितीन बांबर्डेकर, कार्यक्रमाधिकारी वैशाली ओटवणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रफुल वालावलकर म्हणाले, रुग्णसेवा म्हणजे परमेश्वर सेवा अशी श्रद्धा ठेवून काम करणाऱ्या नर्सेसना राष्ट्रीय सेवा योजना विभागातील शिबिरा मार्फत समाजसेवा करण्याची एक सुवर्णसंधी प्राप्त झालेली आहे. त्याचा व्यक्तिमत्व विकासासाठी उपयोग करून घ्या. तुमच्यामध्ये जे बेस्ट आहे ते इतरांना द्या. मानवी सेवेसाठी जिवंत मन, वासल्य, प्रेम, समर्पण वृत्ती आवश्यक असते. ती आपल्यामध्ये विकसित करा. तिला हृदयात जपा. असे सांगत बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी ज्या जिद्दीने, धाडसी वृत्तीने, सामाजिक बांधिलकीच्या नात्याने,समाजाबद्दलच्या तळमळीतून जे प्रामाणिक प्रयत्न करून जुन्या इंगेश हॉस्पिटलचे कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये अत्याधुनिक सेवा सुविधांसहित जे रूपांतर केलेले आहे; ते खरंच कौतुकास्पद आहे. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या परीस स्पर्शाने या हॉस्पिटलला जे देखणे गतवैभव प्राप्त झाले आहे. त्याचा परिसरातील लोकांनी लाभ घ्यावा. असे आवाहनही केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना नेरूरच्या सरपंच सौ. भक्ती घाडीगावकर म्हणाल्या, परमेश्वरभक्तीकडे जाण्याचा मार्ग समाजसेवेतून जातो. राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरा मार्फत ही संधी आपणास उपलब्ध झालेली आहे. तिचा समाज संपर्कासाठी व आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी वापर करा. त्यातून राष्ट्रसेवेमध्ये सहभाग नोंदवा असे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहनही केले. तसेच उमेश गाळवणकर यांनी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जे समाजसेवेचे शिवधनुष्य उचलले आहे ते पेलण्याचे त्यांना सामर्थ्य मिळो. उत्तम आरोग्य मिळो. अशा विधायक कामात आम्ही त्यांच्या सोबात आहोत. असे सांगत शुभेच्छा दिल्या.
नेरूरचे उपसरपंच दत्ताराम म्हाडळकर म्हणाले, नेरूर सारख्या ग्रामीण भागात अशा पद्धतीचे उत्तम व अनेक सोयी सुविधांनी युक्त असलेले हॉस्पिटल पुनर्जीवित केल्याबद्दल बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांचे अभिनंदन आहे. या नेरुर गावाच्या सेवेसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचं शिबिर आयोजित केल्याबद्दल त्यांनी संस्थेचे आभार मानले.
संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांनी देखील आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. हे शिबिर सामाजिक वारसा जपण्याचा एक मार्ग ठरावा. राष्ट्रीय सेवा योजनेच्या या शिबरामार्फत लोकांची मने जिंका. त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हा. त्यांचे जीवन समजून घ्या असे सांगून हे हॉस्पिटल नेरुर ग्रामस्थांच्या सहकार्याने व त्यांच्या पाठिंब्यामुळेच आपण ऊर्जेतावस्तेमध्ये आणू शकलो. त्याला आधुनिकतेचा लूक देऊ शकलो. हे समाजसेवेचे व्रत नेरूर ग्रामस्थ यांच्यासारख्यांच्या पाठिंबामुळे शक्य झाले.
नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्पना भंडारी, प्रा. अरुण मर्गज, प्रा. नितीन बांबर्डेकर यांनी देखील आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी वैजयंती नर, प्रा. शंकर माधव, प्रसाद कानडे, अक्षया सामंत व विद्यार्थी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकेत पाटकर याने तर उपस्थितांचे आभार अर्पिता घाडी हिने मांनले.





