कुडाळ शहरातील ट्रान्सफॉर्मर्सचा सर्व्हे होणार !

वीज समस्यांबाबत युवासेनेने वेधले महावितरणचे लक्ष
अधीक्षक अभियंत्यांचा सकारात्मक प्रतिसाद
कुडाळ शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या विजेच्या समस्यांबाबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि युवासेनेच्या पदाधिकऱ्यानी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली. याबाबत युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी थेट महावितरण अधिकाऱ्यांवर निशाणा साधला आहे. यावेळी महावितरण अधिक्षक अभियंता अभिमन्यू राख यांनी समस्यांची दखल घेत काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. शहरातील ट्रान्सफॉर्मर्सचा सर्व्हे करण्याचे आदेश त्यांनी यावेळी कर्मचाऱ्यांना दिले.
कुडाळ शहरातील नागरिकांना वीज समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांचे जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. सर्वच वॉर्डमध्ये लो व्होल्टेजचा त्रास, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, जळणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि वाढीव बिल या साऱ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या समस्यांकडे महावितरणकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह महावितरणचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांची भेट घेतली. या वेळी शहरातील सर्व वीज समस्यांवर सविस्तर निवेदन देत त्यांनी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली. लोक सांगतील तेव्हाच विभाग हलतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने नागरिकांच्या त्रासाची दखल घेतली पाहिजे, असा संताप श्री. शिरसाट यांनी व्यक्त केला.
कुडाळ आंबेडकर नगर पुतळ्याजवळील मेन कनेक्शनचे फ्युज लोंबकळत पडलेले असून, तिथे विजेचा मोठा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांनी या ठिकाणी विभागाने तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी केली. एखादा अपघात झाला तर जबाबदार कोण? असा थेट सवाल श्री.शिरसाट यांनी अधिक्षक अभियंतांना केला.
कुडाळ शहरातील अनेक ठिकाणी वीजवाहिन्यांना गार्डिंग नसल्याने आणि वेली चढल्याने शॉर्टसर्किटची शक्यता निर्माण झाली आहे. गांधी चौकातील समादेवी मंदिराजवळ पोलजवळ वाहन पार्किंग होत असल्याने धोका आणखी वाढला आहे. या भागांची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मंदार शिरसाटव सुशील चिंदरकर यांनी केली.
नागरिकांनी या बैठकीत वीज बिलांच्या वाढीव रकमेसंदर्भात तक्रारींचा पाढा वाचून दाखवला. बिल अचानक वाढते, हेल्पलाइन नंबर कधीच लागत नाही, आणि वसुली मात्र जबरदस्तीने केली जाते, काही ठिकाणी घरात कोणी नसताना मीटर बसवले जात असल्याचाही आरोप मेघा सुकी ,सुशील चिंदरकर आदिंनी केला.
कुडाळ शहरात बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटरबाबतही नागरिकांचा संशय कायम आहे. या मीटरमध्ये आधीच सिमकार्ड बसवलेले असून, अदाणी कंपनीच्या या मीटरमुळे वाढीव बिलाचा त्रास होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यावर भाष्य करताना युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट म्हणाले,
माजी आमदार वैभव नाईक यांनी ‘स्मार्ट मीटरचे कमी बिल दाखवा आणि १० हजार रुपये बक्षीस मिळवा’ असा फलक लावला होता, पण आतापर्यंत कोणीही ते बक्षीस मिळवलेले नाही. यावरूनच लोकांचा त्रास किती वाढला आहे हे दिसून येते.
यावेळी महावितरण अधिक्षक अभियंता अभिमन्यू राख यांनी समस्यांची दखल घेत काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले.ते म्हणाले, नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध असल्यास आम्ही तातडीने बसवू. ग्राहकांवर कोणताही आर्थिक ताण येणार नाही. मात्र, जुना ट्रान्सफॉर्मर बदलायचा असल्यास तो स्किम अंतर्गत करावा लागतो आणि त्यासाठी नगरपंचायतीचे पत्र आवश्यक आहे. तसेच, पुढील १५ दिवसांत कुडाळ शहरातील प्रत्येक ट्रान्सफॉर्मरचे लोडिंग तपासले जाईल, आणि ८० टक्क्यांहून अधिक लोड असलेल्या ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने बदल करण्यात येईल. तसेच एलटी कंडक्टर आठ दिवसांत बदलण्याचे निर्देश त्यांनी आपल्या यंत्रणेला दिले आहेत.
यावेळी माजी नगरसेविका मेघा सुकी, तालुका प्रमुख कृष्णा धुरी, तसेच सुशिल चिंदरकर, अमित राणे, संदिप महाडेश्वर, सत्यवान काबळी, विनय पालकर, भुषण कुडाळकर, रोहित शिरसाट, शुभम महाडेश्वर आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.





