पालकमंत्री नितेश राणे यांचा जिल्हा प्रशासनावर वचक राहिला नाही

विकासनिधी 100% खर्च करण्याच्या सूचनांना केराची टोपली
मनसेच्या कुणाल किनळेकरांचा आरोप
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी राज्याकडून आलेला सर्व निधी 100% खर्च करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाला आदेश देत विकासाच्या आड येणाऱ्या आळशी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ पक्ष वाढ तसेच इतर पक्षांतील लोकांना आमिषे दाखवत भारतीय जनता पक्षात घेण्यासाठीच जिल्ह्यात येणाऱ्या नितेश राणे यांच्या या आदेशाला प्रशासकीय अधिकारी मात्र केराची टोपलीच दाखवताना दिसत आहेत असा आरोप मनसेचे उपजिल्हाप्रमुख कुणाल किनाळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
कुणाल किनालळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, सन २४-२५ करता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णलायाकरिता आलेल्या निधी पैकी जवळपास ४ कोटी निधी हा अखर्चित राहून शासनास परत गेल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्यात विकासाच्या मोठ्या बाता मारणाऱ्या पालकमंत्र्यांना जिल्ह्यातील अधिकारी जुमानत नसल्याचेच हे उदाहरण असून यासंदर्भात अधिष्ठातांवर कारवाई करण्याचे धाडस पालकमंत्री दाखवणार का असा सवाल मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना केला आहे.
सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जिल्ह्यातील रुग्णांना मेडिकल साहित्य नसल्याने साध प्लास्टर घालण्यासाठी सुद्धा गोवा बांबोळी रुग्णालयात पाठवले जाते. याशिवाय श्वानदंश,सर्पदंश झालेल्या रुग्णांना देखील अत्यावश्यक औषध साठा नसल्याने कोल्हापूर सीपीआर अथवा गोवा बांबोळी येथे पाठवले जात असल्याच्या तक्रारी मनसेकडे प्राप्त आहेत. प्रत्यक्षात जिल्ह्याच्या रुग्ण सेवा व आरोग्य व्यवस्थापनासाठी आलेला जवळपास चार कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहिल्याने शासनाला परत केला जातो यासाठी अधिष्ठाता व त्यांचे प्रशासकीय कर्मचारी कारणीभूत असून अशा अकार्यक्षम जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची हिम्मत पालकमंत्री म्हणून नितेश राणे दाखवणार का असा सवाल मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केला आहे.





