कुडाळ – मालवण रस्त्याबाबत ठाकरे सेनेचे जनआंदोलन

माजी आमदार वैभव नाईक यांनी केले नेतृत्व
सा. बां. च्या अधिकाऱ्यांची झाडाझडती
कुडाळ मालवण राज्य मार्ग सध्या खड्ड्यानी भरून गेला असून वाहन चालकांसाठी तो मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे कुडाळ नेरूरपार मालवण रस्त्याच्या या दुरवस्थेबद्दल लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांना जाब विचारण्यासाठी ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज होबळीचा माळ येथे जनआंदोलन करण्यात आलं. माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे जनआंदोलन करण्यात आलं. रस्त्याबाबत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही या भूमिकेतवर आंदोलक ठाम होते. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसात खड्डे बुजविण्याचे काम सुरु करतो असे सांगितले पण ठेकेदार कोण, २० किमी काम ५० लाखात होऊ शकते का, या वैभव नाईक यांच्या प्रश्नाला मात्र त्यांच्याकडे उत्तर नव्हती. या रस्त्यावरून प्रवास करणे टाळणाऱ्या स्थानिक आमदार आणि पालकमंत्र्यांनी तसेच सत्ताधाऱ्यांनी हा रस्ता लवकरात खड्डेमुक्त करावा अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी माध्यमांशी बोलताना केली.
आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमाराला कुडाळ मालवण रस्त्यावर नेरूरपार पुलाच्या मालवण बाजूने होबळीचा माळ येथे माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे जनआंदोलन करण्यात आले. यावेळी नितीन वाळके, राजन नाईक, हरी खोबरेकर, बाबी जोगी, मंदार शिरसाट, अमरसेन सावंत, गंगाराम सडवेलकर, शेखर गावडे, शिवा भोजने, बाबू टेंबुलकर असे कुडाळ आणि मालवण तालुक्यातील शिवसैनिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. होबळीचा माळ येथून माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाला सुरुवात झाली. या रस्त्यावरून चालणे किती अवघड आहे हे दाखवून देण्यासाठी आणि बैलगाडी चालविणे सुद्धा किती जिकिरीचे आहे हे दर्शविण्यासाठी आंदोलनात बैलगाडी देखील सहभागी झाली होती.
त्यानंतर माजी आमदार वैभव आणि ठाकरे सेनेचे पदाधिकारी नितीन वाळके यांनी माध्यमांशी संवाद साधून महायुती सरकराचा निषेध केला. नितीन वाळके म्हणाले, हा रस्ता खूपच खराब झालेला आहे. येथील स्थानिक आमदार हे सोन्याच्या चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले आहेत. त्यामुळे त्यांना सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखाची जाणीव असण्याचे कारण नाही. पण त्यांच्या कार्यकर्त्यांना तरी याची जाणीव झाली पाहिजे होती. तीस किमी रस्त्यापैकी २० किमीचा रस्ता खड्यांनी भरून गेला आहे. युती सरकारच्या या खड्ड्यात जाणाऱ्या रस्त्याचा तीव्र निषेध करतो असे नितीन वाळके यांनी सांगितले.
माजी आमदार वैभव नाईक यांनी देखील युती सरकारवर जोरदार टीका केली. कुडाळ मालवण तालुक्यातील अनेक रस्ते खराब झाले आहेत. कुडाळ नेरूरपार मालवण या रस्त्याला औद्योगिकदृष्ट्या आणि पर्यटनदृष्ट्या खूप महत्व आहे. अनेक लोक या रस्त्यावरून ये-जा करत असतात. गेल्या काही वर्षात या रस्त्यावर कुठलाही खर्च झाला नाही. त्यामुळे हा रस्ता खड्डेमय बनला आहे. त्यामुळे अनेक अपघात होऊन माणसांना जीव गमवावे लागले आहेत. बरेच जण जायबंदी झाले आहेत. असे असून सुद्धा सत्ताधाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केला. स्थानिक आमदार सुद्धा या रस्त्यावरून न जाता अन्य मार्गाने जातात. हा रस्ता सुधारण्यासाठी लोकांची आग्रही मागणी आहे. सोशल मीडियावर या रस्त्यावर टीका झाली आहे. सत्ताधाऱ्यांनी या रस्त्यावरून एकदा फिरून बघा सर्वसामान्यांचे काय हाल होतात ते अनुभवा अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली.
यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकामच्या कुडाळ आणि मालवणच्या कनिष्ठ अभियंत्यांशी चर्चा केली. त्या अधिकाऱ्यांनी सांगितले कि, काम मंजूर आहे, दोन दिवसात वर्क ऑर्डर मिळून काम सुरु होईल. ओले खड्डे हे खादीकरणाने बुजवणार असे सांगितले. पण वैभव नाईक यांनी त्याचा पर्दाफाश केला. ठेकेदार कोण आहे, किती निधी मंजूर आहे, असे प्रश्न विचारल्यावर अधिकारी निरुत्तर झाले. फक्त ४०-५० लाखात या ३० किमी रस्त्याची डागडुजी होऊ शकेल का असा प्रश्न वैभव नाईक यांनी विचारला आणि अधिकारी निरुत्तर झाले.
या जनआंदोलनादरम्यान कुडाळ आणि मालवण या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी योग्य नियंत्रण मिळवत वाहतूक सुरळीत केली. जन आंदोलनात मोठ्या संख्येने ठाकरे सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक सहभागी झाले होते.





