वस्त्रहरणकार कै. गंगाराम गवाणकर यांना आचरेत विविध संस्थांकडून श्रद्धांजली

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर,आचरा या संस्थेने सोमवार दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता ‘वस्त्रहरणकार’ कै. गंगाराम गवाणकर यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. कै. गवाणकर यांचे दि. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले.
श्री रामेश्वर वाचन मंदिर, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ,आचरा, वैभवशाली पतसंस्था आचरा, यशराज संघटना आचरा, कथामाला मालवण शाखा, कोमसाप मालवण शाखा या संस्थांनी कै. गवाणकर यांना श्रद्धांजली वाहिली. संस्थेचे अध्यक्ष श्री.बाबाजी भिसळे यांनी कै.गवाणकर यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण केला. गवाणकर यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना कै. गवाणकर यांच्या जाण्याने मालवणी बोली भाषेचे मोठे नुकसान झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष व कै. गवाणकर यांचे नातेवाईक श्री. अशोक कांबळी यांनी गवाणकर यांना नाटकांबद्दल कशी ओढ होती, गावातील नाटके बसवतानाचे त्यांचे अनुभव, त्यांचा प्रेमळ स्वभाव इ. बद्दल आपल्या भावना व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली. ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे उपाध्यक्ष श्री. सुरेश गावकर यांनी श्री. अशोक कांबळी यांची कन्या सौ. प्रज्ञा कांबळी – चव्हाण यांनी कै. गवाणकर यांच्या निधनानंतर त्यांना वाहिलेली श्रद्धांजली वाचून दाखविली. वैभवशाली पतसंस्था आचराचे चेअरमन श्री. मंदार सांबारी यांनी कोमसापच्या जिल्हास्तरीय अधिवेशनासाठी कै. गवाणकर हे अध्यक्ष म्हणून लाभलेले होते. तेव्हाचे त्यांचे भाषण व त्यांचा सहवास आपल्याला लाभला. जरी गवाणकर गेले तरीही आपली मालवणी भाषा आपण जपली पाहिजे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल,अशा शब्दातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कथामाला मालवणच्या सचिव श्री. सुगंधा गुरव यांनी त्यांनी लिहिलेली नाटकाची पुस्तके व कोमसाप जिल्हास्तरीय अधिवेशनाच्या अध्यक्षपदी त्यांनी केलेले भाषण इ. बद्दल सांगून आपल्या भावना व्यक्त केल्या. यशराज संघटनेचे अध्यक्ष श्री. मंदार सरजोशी यांनी कै. गवाणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. कोमसाप शाखा मालवणचे अध्यक्ष मा. श्री.सुरेश ठाकूर म्हणाले की, कै. गवाणकर यांचा मला बऱ्याचवेळा सहवास लाभला. त्यांच्या वेगवेगळ्या आठवणी सांगतानाच कै. गवाणकर यांचे आत्मचरित्र ‘व्हाया वस्त्रहरण ‘ याबद्दल त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत बोलताना प्रत्येक उपस्थिताच्या डोळ्यात पाणी आले. प्रत्येकाने मालवणी भाषा जपाच, त्याचबरोबर वाचा असा संदेश देत त्यांनी ‘ऐसी अक्षरे, सारस्वत मित्र, मायमावशी, दर्यावर्दी ‘ हे चार दिवाळी अंक वाचन मंदिरास भेट देऊन कै. गवाणकर यांना श्रद्धांजली वाहिली. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन करता करताच वस्त्रहरण या मालवणी नाटकाने मला काय दिले? यातूनच ग्रंथापालांनी आपली कै. गवाणकरांना श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमास संस्थांचे प्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.





