शिरोडा येथील समुद्रात बुडालेल्यांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून तातडीची सेवा मिळालीच नाही

पिंगुळी येथील मणियार कुटूंबियांनी वैभव नाईक यांच्याकडे मांडली कैफियत
आपत्ती काळात प्रशासनाच्या कुचकामी ठरत असलेल्या यंत्रणेवर आवाज उठविण्याची वैभव नाईक यांची ग्वाही
मणियार कुटुंबियांचे वैभव नाईक यांनी केले सांत्वन
शिरोडा-वेळागर येथे समुद्रावर हजारोंच्या संख्येने पर्यटक येत आहेत. मात्र पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याठिकाणी कोणतीही सुरक्षा यंत्रणा तैनात नाही अथवा सूचना फलक लावलेले नाहीत. धोकादायक ठिकाण म्हणून घोषित केलेले नाही. त्याचबरोबर आमच्या कुटूंबातील ८ जण बुडाले असता त्यांचे मृतदेह काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आली परंतु त्यांच्याकडे बोट उपलब्ध नसल्याने एकाच वेळी सर्व मृतदेह सापडले नाहीत. बेळगाव येथे मृतदेह नेण्यासाठी शासनाची रुग्णवाहिका देखील उपलब्ध झाली नाही त्यामुळे खाजगी रुग्णवाहिकेला पाचारण करावे लागले. त्याठिकाणी जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी,प्रांताधिकारी, तहसीलदार आले परंतु आम्ही दुःखात असूनही म्हणावी तशी तातडीची सेवा आम्हाला मिळाली नाही.घडलेल्या घटनेसाठी आम्ही कोणाला जबाबदार धरत नाही परंतु अशी वेळ अन्य कोणावर येऊ नये यासाठी आपल्या पर्यटन जिल्ह्यातील सुरक्षा विषयक सर्व यंत्रणा,आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कायम तैनाद असाव्यात, पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी प्रशासनाकडून घेतली जावी अशी भूमिका पिंगुळी येथील मणियार कुटूंबियांनी मांडली आहे.
शिरोडा-वेळागर येथील समुद्रात मृत पावलेल्या पिंगुळी येथील युवकांच्या कुटुंबियांची माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट घेत सांत्वन केले. यावेळी मणियार कुटूंबियांनी वैभव नाईक यांच्याकडे आपली कैफियत मांडली. याबाबत जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन जिल्हयात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणार आणि आपत्ती काळात प्रशासनाच्या कुचकामी ठरत असलेल्या यंत्रणेवर आवाज उठविणार असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, पिंगुळी विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर,उपविभाग प्रमुख सचिन ठाकूर, युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, अमित राणे आदी उपस्थित होते.





