पंचायत राज अभियान विशेष आचरा ग्रामसभेस ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

इनाम जमिनीमुळे ॲग्री स्टॅक बाबत ग्रामस्थ आक्रमक

आचरे गावात इनाम जमिनीमुळे कुळ असलेल्या बहुतांशी ग्रामस्थांचे अँग्री स्टॅक होत नसल्याच्या मुद्यावर ग्रामस्थ आक्रमक होत ग्राम महसूल अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यामुळे कसवटदार शेतकऱ्यांना शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागणार असल्याचे सांगत ग्रामस्थ आक्रमक झाले. शेवटी सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी याबाबत ग्रामपंचायत ठरावा द्वारे जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधण्याचे तसेच ग्राम महसूल अधिकारी श्रीमती शिरसाट यांनी
वरीष्ठांना तातडीने अहवाल सादर करत वंचित ग्रामस्थांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या निर्णयानंतर हा विषय स्थगित करण्यात आला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाबाबत आचरा ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांना सरपंच फर्नांडिस यांनी पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली. यावेळी त्यांच्या सोबत उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामविकास अधिकारी पद्माकर कासले,ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर, पंकज आचरेकर, महेंद्र घाडी, चंदू कदम यांसह इतर ग्रामपंचायत सदस्य ग्राममहसूल अधिकारी,प्राथमिक आरोग्य विभाग, पशुवैद्यकीय अधिकारी, कृषी यांसह बचतगट प्रतिनिधी, महिला बहुसंख्येने उपस्थित होते.
सुरुवातीला ग्रामपंचायत सभागृहात होणारी सभा चारशेच्या वर उपस्थिती गेल्याने ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ग्रामपंचायत लगतच्या हाॅटेलच्या मोकळ्या जागेत घेण्यात आली. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सभेच्या सुरुवातीला ग्रामविकास अधिकारी कासले यांनी सभेपुढील विषय स्पष्ट केले. यात ॲग्री स्टॅक बाबत ग्राम महसूल अधिकारी श्रीमती मौसमी शिरसाट या माहिती देत असताना ग्रामस्थ अभिजित सावंत यांनी आचरा गावातील जमिनी कुळ वहिवाटीच्या असल्याने बहुतांशी असलेल्या कुळांचे अग्रीस्टॅक होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करून ग्राम महसूल अधिकारी श्रीमती शिरसाट यांना स्पष्टीकरण देण्याची मागणी केली .मात्र त्या योग्य माहिती देत नसल्याने माहिती देवू शकेल अशा सक्षम अधिका-यांना पाचारण करण्याची मागणी उपस्थितांमधून करण्यात आली. खुद्द भोगवटा तसेच ज्यांच्या नावावर घरभाटाची ठराविक गुंठे जागा आहे त्यांचेच ॲग्री स्टॅक होत आहे. बाकी उर्वरित जागेची तसेच इ पीक नोंदणीही कसवटदार शेतकऱ्यांच्या नावे होत नसल्याने शेती विमा, इ पीक, ॲग्री स्टॅक या गोष्टींपासून आचरेगावचे कसवटदार शेतकरी कुळे वंचित राहणार असल्याचा मुद्दा ग्रामस्थांनी उपस्थित करुन ग्राममहसूल अधिकारी श्रीमती शिरसाट यांना याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले मात्र त्यांच्याकडून समर्पक उत्तर मिळत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. ग्रामसभेत हा विषय अजेंड्यावर होता तर याबाबत येथील समस्या बाबत जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शन का मागविले नव्हते. येथील शेतकऱ्यांचे होणारे नुकसान कोण भरून देणार असे प्रश्न उपस्थित करत ग्रामस्थांनी ग्राममहसूल अधिका-यांना धारेवर धरले. याबाबत योग्य ती माहिती देण्यासाठी सक्षम अधिका-यांना बोलविण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा बघत शेवटी सरपंच फर्नांडिस यांनी ग्राममहसूल अधिकारी शिरसाट यांना वरीष्ठांना योग्य तो अहवाल पाठवून याबाबतचा निर्णय तातडीने ग्रामपंचायत ला कळविण्याच्या सुचना केली. तसेच ग्रामसभेचाही ठराव जिल्हाधिकारी यांना सादर करणार असल्याचे सांगितले. यामुळे ग्रामस्थांनी शांत होत याबाबत लवकर निर्णय न झाल्यास ग्रामस्थ आक्रमक होण्याचा इशारा आचरेवासियांतर्फे देण्यात आला.

error: Content is protected !!