पालकमंत्र्यांचा दणका, अन् कणकवलीतील मटका धाडीतील आरोपींची संख्या तब्बल 75 वर

मटका घेतल्याप्रकरणी गुन्ह्यात अजून 63 जणांचा समावेश
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासातील बहुदा पहिलीच कारवाई
सर्व संशयित आरोपींकडून पोलीस हमीपत्र घेणार
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली शहरातील मटका बुकी असलेल्या प्रकाश घेवारी याच्यावर स्वतः धाड टाकल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्या सहित अवघ्या राज्यामध्ये एकच खळबळ उडाली होती. ही राणे स्टाईल चर्चेत आलेली असतानाच याप्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मुद्देमाल जप्त केल्यावर घेवारी याच्या मटका स्वीकारत असलेल्या ठिकाणाहून लॅपटॉप सह अन्य मुद्देमाल जप्त केला होता. या लॅपटॉप मध्ये नावे व नंबर असलेल्या एकूण 63 जणांना या गुन्ह्यामध्ये सह आरोपी करण्यात आले आहे. या जिल्ह्यातील एकूण आरोपींची संख्या आता 75 झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मटक्या च्या गुन्ह्यांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने एकाच वेळी आरोपी होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. यामुळे या अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले असून या सर्व आरोपींकडून पुन्हा मटका, जुगार खेळणार किंवा स्वीकारणार नसल्याचे हमीपत्र घेण्यात येणार असल्याची माहिती या गुन्ह्याचे तपासणी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर सावंत यांनी दिली.
कणकवली शहरातील मटका बुकी अड्ड्यावर धाड टाकल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी अवैध धंद्या च्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. या घटनेनंतर थेट पोलीस अधीक्षकांना फोन लावून पालकमंत्र्यांनी हे काय चाललंय? असा सवाल विचारला होता. या प्रकरणी कणकवलीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचे निलंबन देखील झाले होते. मटका घेत असल्या प्रकरणी प्रकाश घेवारी याच्यासह 12 जणांवर कणकवली पोलीस स्टेशनमध्ये मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी घेवारी अन्य सहकाऱ्यांच्या ताब्यातून लॅपटॉप सह मोबाईल व मुद्देमाल जप्त केला होता. या जप्त मुद्देमालातील लॅपटॉप हा महत्त्वाचा पुरावा ठरला होता. या लॅपटॉपमध्ये असलेल्या मटका घेणाऱ्या स्टॉल धारकांपासून मटका स्वीकारणाऱ्या ची नावे व मोबाईल नंबर देखील होते. पालकमंत्री नितेश राणे यांनी या गुन्ह्यातील अनेक महत्त्वाचे पुरावे हे हाती आल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यानंतर पोलिसांकडून या गुन्ह्यात तपासाची चक्रे फिरू लागली व त्यात कणकवली व मालवण तालुक्यातील मिळून तब्बल 63 मटका स्वीकारणाऱ्यांची नावे व मोबाईल नंबर आढळून आले. या सर्वांना कणकवली पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली असून या गुन्ह्यात तपासासाठी आवश्यक त्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे. तसेच संबंधित गुन्हा दाखल झालेल्या एकूण 75 जणांना कडून पुन्हा यापुढे जुगार मटका खेळणार किंवा स्वीकारणार नाही असे हमीपत्र देखील लिहून घेतले जाणार असल्याचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सावंत यांनी सांगितले. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी देखील अनेकदा मटका व्यवसायातील बड्या धेंडावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु एकाच वेळी एकाच गुन्ह्यात एवढ्या मोठ्या संख्येने आरोपी करण्याची ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुदा पहिलीच वेळ असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मटका खेळताना किंवा मटका घेताना दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये या गुन्ह्याची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस दलाच्या इतिहासात नोंद होणार आहे.
दिगंबर वालावलकर कणकवली





