जि. प. प्राथमिक शाळा नडगिवे नं. १ येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नडगिवे नं.१ या प्रशालेत आज दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी ‘माजी विद्यार्थी मेळावा’ अतिशय उत्साह पूर्ण व आनंदमय वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्यासाठी मान. श्री. अमित मांजरेकर (माजी सरपंच) मान. श्री. प्रशांत धावडे (ग्रामपंचायत सदस्य) मान. श्री. जितेंद्र मण्यार, (पोलीस पाटील) मान. श्री. भावेश कर्ले (माजी उपसरपंच) श्री. सतीश कर्ले (व्यव.समिती अध्यक्ष) मान. सौ. साक्षी आंबेरकर( व्यव.समिती उपाध्यक्ष) मान. श्री. रूपेश हिवाळकर (माजी विद्यार्थी) मान. श्री सुभाष सुतार, श्री. सतीश सुतार, श्री. संतोष सुतार, आनंद सुतार, श्री. राजेश आंबेरकर, श्रीम. प्रतीक्षा मांजरेकर, सौ. वर्षा राजेश आंबेरकर, सौ. वर्षा विजय आंबेरकर ,रितेश सुतार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय श्री. रवींद्र खेबुडकर साहेब यांच्या निर्देशानुसार हा नाविन्यपूर्ण व महत्त्वाकांक्षी उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबवला जात असून त्याची उत्तम फलनिष्पत्ती या मेळाव्याच्या माध्यमातून दिसू येत आहे.
*’सहभागाचे गीत नवे हे समरसतेने गाऊया, गावकऱ्यांनो शाळेसाठी जगून जरासे पाहूया…. या ओळी यथार्थ सार्थ होताना पहायला मिळतात, ते अशा मेळाव्याच्या माध्यमातूनच! या मेळाव्याच्या निमित्ताने अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने सर्व माजी विद्यार्थी बंधू आणि भगिनींचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या आजी विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका, सन्मा. अनिता पाटकर मॅडम यांनी सर्व अतिथींचे शाब्दिक स्वागत केले. मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे यथोचित उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी शाळेने राबवलेल्या ‘नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या पुस्तिकेचे’ मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हे उपक्रम विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात व भविष्यात फार महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील व विद्यार्थी गुणवत्ता विकास अतिशय उत्कृष्ट पद्धतीने होईल. असे गौरवोद्गार मान. श्री.अमित मांजरेकर (माजी सरपंच नडगिवे )यांनी या प्रसंगी काढले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. पाटकर मॅडम यांनी मांडताना शाळेच्या भौतिक सोयी सुविधांचा व शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा सर्वांसमोर मांडला .मनोगत व्यक्त करताना मान. श्री. रुपेश काशीराम हिवाळकर, मान. श्री भावेश कर्ले यांनी शाळेच्या गोड आठवणी सांगत आज शाळेने घेतलेल्या उत्तुंग भरारीचे, उत्कृष्ट उपक्रमांचे भरभरून कौतुक केले. शाळेप्रती आमची असलेली निष्ठा व जबाबदारीचे भान आम्ही परिपूर्णतेने पार पाडू असे जाहीर केले.
या प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री. गुरुनाथ पाटील यांनी फोनवरून संपर्क साधत या शाळेसाठी प्रोजेक्टर देण्याचे जाहीर केले. तसेच श्री. संजय मण्यार यांनी ही बहुमोल वस्तू रूप मदत केली. शाळेला मदत करणा -या दात्यांचे सर्व सभागृहाने आभार मानले .तदनंतर माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात आला. सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे पदवीधर शिक्षक, श्री. संदीप कदम यांनी केले.




