हरकुळ खुर्द गावातील मंदिरातील जातीभेद संपवा

चव्हाणवाडी वासीयांचे सरपंच याना निवेदन

मंदिर जातीभेद बंदसाठी झटणाऱ्या शुभांगी पवार यांची उपस्थिती

हरकुळ खुर्द ता. कणकवली या गावातील पावणादेवी मंदिरात चर्मकार समाजाच्या लोकांवर जातिभेदामुळे मंदिर प्रवेश नाही, ओटी व गाऱ्हाणे वेगळ्या ठिकाणी केले जाते, देवाची तळी चव्हाणवाडीत येत नाही, देवळात चर्मकार समाजाचा मानकरी नाही असा अन्याय होत आहे. तसेच गावात चर्मकार समाजात कोणी मयत झाले तर गावातील दबावामुळे केशकर्तनकार क्षौरविधी करायला येत नाही. शाळेतून मुले वनभोजनाला पावणादेवी मंदिराकडे गेली तर चर्मकार समाजाच्या मुलांनाच तेवढे हेरून बाहेर थांबवले जाते. अशा गोष्टींचा उल्लेख करून हा अन्याय यापुढे संपवावा असे निवेदन चव्हाणवाडी येथील रहिवास्यांनी सरपंच राजन रासम याना सोमवारी 27 मार्चला सादर केले.

यावर मंगेश चव्हाण, सचिन चव्हाण, आकाश चव्हाण इ. तीस जणांच्या सह्या असून कणकवली येथील शुभांगी पवार हे निवेदन सादर करताना हजर होत्या. शुभांगी पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिरात होणारा जातीभेद बंद व्हावा म्हणून सातत्याने आवाज उठवला आहे.

या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार, कणकवली पोलीस स्टेशन तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याना पाठवल्या जातील असे निवेदनकर्त्यांनी सांगितले. एकविसाव्या शतकातही सिंधुदुर्ग सारख्या पुढारलेल्या जिल्ह्यात होणारे हे प्रकार दुःखदायक व संतापदायक असून हे पूर्णपणे बंद व्हावेत व या अडाणीपणाला तात्काळ मूठमाती मिळावी अशी इच्छा शुभांगी पवार यांनी व्यक्त केली. या निवेदनाकडे दुर्लक्ष केल्यास वरिष्ठ पातळीवर दाद मागून हा अन्याय शांतता व सलोख्याने लवकरच संपवू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे शाळेतील मुलांना सुद्धा जातीभेदाचे लक्ष्य केले जात आहे, हे अत्यंत दुःखदायक असून याबद्दल जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला जाईल असे त्या म्हणाल्या.

कणकवली/सितराज परब

error: Content is protected !!