आवळेगांवमध्ये गोठ्याला आग लागून म्हैस गतप्राण

शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
कुडाळ : आवळेगांवमध्ये काल सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान नदीकडील भागात अज्ञाताने आग लावल्याने ती आग ही संपूर्ण जमिनीवरील करड पेटून सत्यवान कानसे यांच्या गाेठ्याला लागून गाेठा पूर्णपणे जळून भस्मसात झाला. यामध्ये म्हशी पण हाेरपळल्या तसेच गोठ्याचे माेठे नुकसान झाले आहे. या आगीत त्यांच्या सहा म्हशी बांधलेल्या हाेत्या. हा आगीचा भडका पाहून आरडाआेरड झाली. परंतु, दरम्यानच्या काळात त्यापैकी एक माेठी म्हैस आगीत १०० टक्के भाजल्याने तिचा मृत्यू झाला. तर अन्य २ म्हैशी पण ब-याच भाजल्या, अन्य ३ वाचवण्यात यश आले. यावेळी काहीनी संबंधित अधिकारी वर्गांना माेबाईलवरून कल्पना दिल्यावर सरपंच पूर्वा सावंत, उपसरपंच विवेक कुपेरकर, बीडीओ विजय चव्हाण, पशुवैद्यकीय अधिकारी देसाई, भाजप तालुकाध्यक्ष दादा साईल, देवेंद्र सामंत, विजय पवार, चंद्रहास सावंत, अमित तावडे, आबा सावंत, महादेव सावंत यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. या दुर्घटनेचा पंचनामा करण्यासाठी सूचना देण्यात आल्यात.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ





