सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पावसाची तीव्रता वाढली, पालकमंत्र्यांचा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना ‘अलर्ट मोड’वर काम करण्याचा आदेश

आपत्ती प्रसंगी जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार – नितेश राणे
शिवापूर, दुकानवाडसह अनेक गावांचा संपर्क तुटला, वीज आणि वाहतूक व्यवस्था कोलमडली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे, असे स्पष्ट निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक नुकतीच राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, प्रभारी पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. राणे यांनी सांगितले की, वीज खात्याने अधिक सतर्क राहून वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम तत्काळ करावे. भविष्यातील दुरुस्ती कामांसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्यात येणार असून, डिसेंबरपर्यंत भूमिगत वीज जोडणी पूर्ण केली जाईल.
जिल्ह्यातील शिवापूर, वसोली, उपवडे, आंजिवडे व दुकानवाड या गावांचा संपर्क तुटलेला असून, तेथे एसटी सेवा बंद आहे तसेच वीज व मोबाईल नेटवर्कही ठप्प झाले आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश राणे यांनी दिले आहेत. दुकानवाड येथे सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले.
घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन त्या ठिकाणी यंत्रणा तैनात ठेवण्याचे आणि धोका असलेल्या भागांमध्ये कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.
पावसाळ्यात आरोग्य विभागाने साथीच्या आजारांचे नियंत्रण ठेवण्यासाठी नियोजन करावे, तसेच कोविडबाबत जनजागृती करण्यावर भर द्यावा, असेही राणे यांनी सांगितले. वन विभागाने धोकादायक झाडे व फांद्या कापून रस्ते मोकळे ठेवावेत. एसटी विभागाने प्रवाशांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी. नगरपालिकांनी नालेसफाई आणि रस्त्यांची कामे तात्काळ पूर्ण करून पावसाळ्यात स्वच्छता राखावी, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
आपत्तीच्या प्रसंगी शासन जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून, सर्व यंत्रणांनी एक टीम म्हणून ‘अलर्ट मोड’वर कार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.





