कणकवलीतील सुतारवाडी रस्ता कामाचा शुभारंभ

शहरवासीयांतर्फे नलावडे, हर्णे यांचे मानले आभार
कणकवली शहरातील मधलीवाडी – सुतारवाडी येथील रस्ता कामाचा शुभारंभ नुकताच पार पडला. सुतारवाडी येथील प्रतिष्ठीत नागरिक अरुण मेस्त्री यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, किशोर राणे, माजी नगरसेवक चारुदत्त साटम, ठेकेदार अनिल पवार, श्री. साटम, तसेच तेथील रहिवासी जनार्दन सामंत, शंकर धुरी, नितीन काणेकर, नीलेश कडुलकर, राकेश कडुलकर, राजा कडुलकर, सौ. सामंत, सौ. काणेकर आदी उपस्थित होते. सुतारवाडी येथे पक्का रस्ता नसल्याने दरवर्षी तेथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. गतवर्षी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्वखर्चाने तात्पुरती माती टाकून रहिवासीयांची गैरसोय दूर केली होती. मात्र यावेळी तेथील रहिवासियांच्या पाठपुराव्यानंतर समीर नलावडे, बंडू हर्णे, किशोर राणे यांच्या प्रयत्नातून नगर पंचायतीच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला. या रस्त्याचे खडीकरण पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास केले जाईल. तसेच या भागातील वीज समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी श्री. नलावडे व श्री. हर्णे यांनी दिले. रहिवासीयांतर्फे याबद्द्ल आभार मानण्यात आले.