नारायण राणेंना न जुमानता कोकणातील जनता जल्लोषात उद्धव ठाकरेंचे चे स्वागत करेल

राणेंनी केलेल्या टीकेला माजी आमदार वैभव नाईक यांचे जोरदार प्रत्युत्तर
निलेश राणेंनी गृहमंत्र्यांचे आणि पालकमंत्र्यांचे अपयश जनतेसमोर आणल्याची वैभव नाईक यांची टीका
कोंबड्यांवरून या राज्यात कोणता नेता परिचित आहे हे सर्वांना माहित आहे. मी त्याबद्दल जास्त काही बोलणार नाही. मात्र उद्धवजी कोकणात येतील तेव्हा आम्ही त्यांचे ताकतीने स्वागत करू. सामान्य कार्यकर्त्यांच्या घरात देखील उद्धवजी जातात त्यामुळे कोकणातील सामान्य जनता त्यांचे जल्लोषात स्वागत करेल असे प्रत्युत्तर माजी आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंच्या टीकेवर दिले आहे. बदले घेण्यासाठी, धकम्या देण्यासाठीच नितेश राणेंना भाजपने मंत्री पद दिले आहे का? असा सवालही वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे. सिंधुदुर्गात सुरु असलेल्या गांजा विक्रीबाबत आणि ड्रग्ज मुद्द्यावर निलेश राणे यांनी आवाज उठवून सत्ताधारी भाजपचे, गृहमंत्र्यांचे आणि पालकमंत्र्यांचे अपयश जनतेसमोर आणले असल्याची टीका देखील वैभव नाईक यांनी केली आहे.
नारायण राणेंनी उद्धवजींवर केलेल्या टीकेवर वैभव नाईक म्हणाले, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी कोकणासाठी आणि सिंधुदुर्गसाठी भरभरून दिले आहे. कोरोना महामारी झाल्यानंतर उद्धवजी ठाकरे यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर केली. सिंधुदुर्गात तौकते चक्रीवादळ झाले तेव्हा याच उद्धवजी ठाकरे यांनी जिल्हावासियांना भरीव अशी आर्थिक मदत मिळवून दिली आणि त्याचवेळी केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग वासियांना एक दमडी सुद्धा दिली नाही. चिपी विमानतळाचे काम अनेक वर्ष रखडले असताना उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी विमानतळाचे उद्घाटन केले. मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाचे देखील त्यांनीच भूमिपूजन केले. उद्धवजी ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून थोडका कालावधी मिळाला या थोडक्या कालावधीतही अनेक कामे मार्गी लावण्याचे काम उद्धवजीनी केले. नारायण राणे यांच्यासारख्या अनेक लोकांना बाळासाहेबांनी त्यानंतर उद्धवजींनी भरभरून दिले. अनेक कोकणी माणसांना आमदार, खासदार बनवले हे सगळेच लोक नारायण राणे सारखे कृतघ्न असू शकत नाहीत. कोकणी माणूस कधी कृतघ्न होणार नाही उद्धवजींच्या आगमनाची कोकणी माणसे वाट पाहत असतात ते जेव्हा येतील तेव्हा त्यांचे भरभरून स्वागत केले जाईल. राणे आपल्या हॉटेलमध्ये तसा बोर्ड लावू शकतील परंतु जनतेच्या मनात असलेले उद्धवजींचे नाव तुम्ही खोडू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. उद्धवजी येतील तेव्हा कोकणातील जनता त्यांचे भरभरून स्वागत करेल.
भाजपमध्ये प्रवेश केला नाहीतर निधी देणार नाही, विरोधकांना जिल्ह्यातून हद्दपार करणार, विरोधकांचा बदला घेणार अशा धमक्या नितेश राणे देत आहेत यासाठीच भाजपने नितेश राणेंना मंत्री केले आहे का? असा सवाल वैभव नाईक यांनी उपस्थित केला. जिल्ह्यात अनेक खून प्रकरणे झाली आहेत त्याचा बदला देखील लोकांनी घेतला असता परंतु लोकांनी कोर्टाचा निर्णय स्वीकारला त्यामुळे नितेश राणे यांनी कोणाला धमकी देऊ नये अन्यथा त्यांच्या धमक्यांना त्याच भाषेत उत्तर देऊ असा इशारा वैभव नाईक यांनी दिला.
गेली अडीच वर्षे राज्यात भाजप पक्षाचेच गृहमंत्री होते. आताच्या सरकारमध्ये देखील भाजपचेच गृहमंत्री आहेत. निलेश राणे यांचे बंधू सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत असे असताना देखील सिंधुदुर्गात ड्रग्ज, गांजा विक्री सुरू असल्याबाबत आणि पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत असल्याबाबतचा आरोप निलेश राणे यांनी जिल्हा नियोजन बैठकीत केला आहे. त्यामुळे निलेश राणे यांनी सत्ताधारी भाजपचे, गृहमंत्र्यांचे आणि पालकमंत्र्यांचे अपयश जनतेसमोर आणले आहे अशी टीका वैभव नाईक यांनी केली.
वैभव नाईक म्हणाले, मी जनहिताचे काम केले ते लोकांसमोर असल्यामुळेच राणे यांना दुसऱ्या पक्षात प्रवेश करून तिकीट घ्यावे लागले. लोकांना वेगवेगळी आमिषे द्यावी लागली. आर्थिक रसद पुरवावी लागली. वडिलांना मतदारसंघात आणून बसावावे लागले. एवढे करून देखील केवळ आठ हजार मतेच त्यांना जास्त मिळाले मी अपयशी असतो तर ७३ हजार लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला नसता. मी माझा पराभव मान्य केला आहे आणि माझे काम सुरू ठेवले आहे असे वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.