नितेश राणे आणि न.पं. प्रशासनाने विस्थापित स्टॉलधारकांची अधिकृत व्यवसाय करण्यासाठी व्यवस्था करावी
ठाकरे शिवसेनेची पत्रकार परिषद घेत मागणी
ज्यावेळी महामार्गाच्या उड्डाणपुलाचे काम सुरु करायचे होते त्यावेळी गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या महामार्गावरील स्टॉलधारकांची बैठक घेत आ. नितेश राणे यांनी त्यांचे योग्य जागेत पुनर्वसन केले जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र गेल्या चार वर्षात त्यांनी याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. तर नगरपंचायतीनेही भाजीसह अन्य दुकानदारांना पुलाखाली बसण्यास दिल्याने हिच आमची अधिकृत जागा असा त्यांचा समज झाला आणि त्यांनी आपला व्यवसाय वाढवला. मात्र त्या स्टॉलधारकांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे आतातरी आ. नितेश राणे आणि न.पं. प्रशासनाने त्या स्टॉलधारकांना अधिकृत जागेत त्यांना व्यवसाय करण्यासाठी व्यवस्था करावी अशी मागणी ठाकरे गटाच्या शिवसेने कडून पत्रकार परिषदेत करण्यात आली.
कणकवलीतील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी नगरसेवक सुशांत नाईक, शहरप्रमुख प्रमोद मसुरकर, युवासेनेचे राजू राठोड उपस्थित होते. न.पं. ने ज्यावेळी पुलाखाली दुकानदारांना बसण्यास दिले त्यावेळी त्यांना न.पं. च्या खर्चातून कापड बांधून दिले. त्यांच्याकडून रोज कर आकारणी केली जात होती. त्यावेळी न.पं.ने ही जागा अधिकृत आहे की अनधिकृत आहे याचा विचार केला नाही. सर्वसामान्य नागरिकांना रोज लागणारा बाजार हा त्या ठिकाणी उपलब्ध होत होता. मात्र आज हायवे प्रशासनाने कारवाई केल्यानंतर ते स्टॉलधारक अडचणी आले आहेत. खरे तर त्यांची पर्यायी व्यवस्था होणे आवश्यक होते. हायवे प्रशासनाने आज कारवाई केली पंरतु ज्यावेळी न.पं.ने त्यांना बसण्यास सांगितले त्यावेळी हायवेने न.पं.ला विचारणा करणे आवश्यक होते. यामुळे स्टॉलधारकांचे नुकसान झाले नसते. त्यामुळे किमान यापुढे तरी त्यांची फसवणूक होवू नये म्हणून न.पं. प्रशासन आणि आ. नितेश राणे यांनी या स्टॉलधारकांची अधिकृत जागेत व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्यांची पुन्हा आता फसवणूक होता कामा नये असे पारकर म्हणाले.
कणकवली प्रतिनिधी