कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनचा शासकीय कर्मचारी/ अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी संपाला पूर्ण पाठिंबा

कणकवली : कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनची मासिक सभा सन्मा.श्री सिताराम उर्फ दादा कुडतरकर यांचे अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक 15 /3 /2023 रोजी सकाळी 10:30 वाजता कलमठ येथील पेन्शनर भवन मध्ये पार पडली.सभेत प्रथमतः दिवंगत ज्ञात- अज्ञात पेन्शनर्स संबंधितांना श्रद्धांजली वाहण्यात आली.सभेतील इतिवृत्त वाचन ,जमाखर्च मंजुरी, नवीन देणगीदारांचे अभिनंदना बरोबर पेन्शनर भवनच्या जागेच्या ठिकाणाबाबतच्या अडचणीबाबत व इमारती संबंधात सुधारणा होण्यासाठी रंगकाम इत्यादीसाठी निधीची उपलब्धता आवश्यकतेबद्दल सन्मा.अध्यक्ष श्री सिताराम उर्फ दादा कुडतरकर यांनी सभेत चर्चा घडवली व त्यावर निर्णय घेण्यात आले.सदर सभेला सिंधुदुर्ग जिल्हा पेन्शनर संघटनेचे जिल्हाध्यक्ष सन्मा. श्री आंबेकर साहेब उपस्थित होते. त्यांचा सभागृहात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्याचप्रमाणे नवीन सभासदांचे अभिनंदन करण्यात आले.जिल्हाध्यक्ष सन्मा. श्री आंबेकर साहेब यांनी पेन्शनर संघटना आजच्या स्थितीला किती महत्त्वाची व आवश्यक आहे.आपल्या पेन्शन विषयक हक्कासाठी किती सतर्क राहिले पाहिजे. कामकाजासाठी आर्थिक पाठबळ, योगदान पेन्शनरनी केले पाहिजे. पेन्शन संबंधी नवीन नवीन बाबी, शासकीय निर्णय ,आपल्या अडचणी यासाठी संघटनेची तालुका जिल्हा व राज्यस्तरापर्यंत संपर्क ठेवण्यासाठी संघटनेचे माध्यम अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले.त्याचबरोबर आजच्या मासिक सभेत जुन्या व नवीन पेन्शन बाबत सभेत चर्चा करताना सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रचूड साहेब यांनी निकाल दिल्याप्रमाणे पेन्शन ही पेन्शनरांना भीक नसून त्यांचा मौलिक अधिकार आहे. ती रद्द करण्याचा कोणालाही अधिकार नाही. पेन्शनही कल्याण व न्याय प्रदान करते त्यामुळे तो सन्मानाने जीवन जगतो. असे परखड विचार सभेत मांडले. आजच्या सभेत 1 नोव्हेंबर 2005 व त्यानंतर नियुक्त शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे संबंधात दिनांक 14/03/2023 पासून ला विविध संघटनांनी पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपाबाबत सन्मा.जिल्हाध्यक्ष श्रीयुत आंबेकर साहेब यांच्या समवेत चर्चेत सभेत सर्वानुमते ठरल्यानुसार सदर राज्यव्यापी बेमुदत संपास कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सन्मा. अध्यक्ष श्री दादा कुडतरकर यांनी जाहीर केले .सदर सभेस सन्मा. उपाध्यक्ष श्री मनोहर पालयेकर ,सचिव श्री व्ही.के. चव्हाण, सहसचिव श्री जी .एल. सावंत सन्मा. कार्यकारिणी सदस्य श्री सुरेश पाटकर , श्री भास्कर वंजारे ,श्री अशोक राणे ,श्री सखाराम सपकाळ , श्री परशुराम साधले, सिद्धार्थ तांबे ,नवीन सभासद श्रीमती सुगंधा देवरुखकर, श्री हरी चव्हाण इत्यादी उपस्थित होते.

मयुर ठाकूर./ कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!