शिडवणे पाष्टेवाडी ग्रामस्थ व मुंबई मंडळाने शिडवणे नं.१ शाळेतील मुलांना दिलेले साहित्य कौतुकास्पद

माजी वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार यांचे प्रतिपादन

शिडवणे नं. १ शाळेतील ५१ मुलांची थंडीची गरज ओळखून सर्व मुलांना ऊब मिळावी या उद्देशाने शिडवणे पाष्टेवाडी ग्रामस्थ व मुंबई मंडळ यांनी दिलेली स्वेटर भेट दिली ही बाब कौतुकास्पद व उपयोगी देखील आहे. असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार यांनी केले.
माजी वित्त बांधकाम सभापती रविंद्र जठार म्हणाले “ शाळा सुरु झाल्यापासून शाळेसाठी विविध देणगीदार आणि देणगीदार संस्था नेहमीच पुढे सरसावतात. मुलांना आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्याचे वितरण करत असतात. यावेळी शिडवणे पाष्टेवाडी ग्रामस्थ व मुंबई मंडळ यांनी दिलेली स्वेटररुपी भेट ही सर्व मुलांसाठी अनमोल अशी भेट ठरली असून मंडळाने आणि मंडळाच्या सर्व सदस्यांनी शाळेसाठी दिलेले योगदान उल्लेखनीय असे आहे. गावाच्या वतीने आम्ही मंडळाचे आभार व्यक्त करीत आहोत.
उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी सर्व उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते सर्व ५१ मुलांना स्वेटर वितरण करण्यात आले. स्वेटर मिळाल्याबद्दल शालेय स्वराज्य मंडळाचे विद्यार्थी मुख्यमंत्री केतन सुरेश सुतार आणि विद्यार्थिनी मुख्यमंत्री श्रेया राजेश पाळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिडवणे पाष्टेवाडी ग्रामस्थ , मुंबई मंडळ यांनी दिलेल्या उबदार भेटीबद्दल दोन्ही मुलांनी मंडळाचे मनापासून आभार मानले.
दुर्गवीर प्रतिष्ठानचे सदस्य व शिडवणे पाष्टेवाडी मंडळाचे सदस्य मा. प्रशांत वाघरे यांनी मुलांशी हृदय संवाद साधला. ते म्हणाले , “ मुलांनो , तुम्हाला विविध शैक्षणिक सोयी , सुविधा मिळत आहेत , त्यांचा पुरेपूर उपयोग करुन घ्या. तुम्ही आमचे भावी पदाधिकारी , अधिकारी आणि आधारस्तंभ आहात . तुम्ही खूप अभ्यास करुन आपल्या जीवनात यशस्वी होताना आम्हाला बघायचे आहे. तुम्ही आपल्या गावाचे नाव सर्वदूर पोचवावे यासाठी अभ्यास करा , खेळात यश मिळवा . आम्ही सतत तुमच्या सोबत आहोत . तुमच्या गरजा ओळखूनच आमचं मंडळ तुम्हाला ही उबदार भेट देत आहे. त्याचा नक्की वापर करा. ”
शिडवणे पाष्टे वाडी मंडळाचे खजिनदार मा. मंगेश वारिसे म्हणाले , “ आम्ही जेव्हा प्राथमिक शिक्षण घेतले तेव्हाची परिस्थिती खूप वेगळी होती. आता शिक्षण प्रक्रियेमध्ये बदल झाला आहे. तरीही आमच्या शिडवणे पाष्टेवाडी ग्रामस्थ मंडळ मुंबई यांनी मुलांसाठी चांगलं देण्याचा विचार केला आणि केलेला विचार आम्ही आज अमलात आणताना अतिशय आनंद होतो आहे. शाळा डिजिटल झाली पाहिजे म्हणून आम्ही शाळेला लॅपटॉप दिले. अजूनही शाळेला काही गरज लागली तर आम्ही द्यायला नेहमीच तयार आहोत. वायफाय किंवा पिकनिक करिताही काही मदत करता येईल का , याचा आम्ही विचार करत आहोत. आम्हाला शिक्षण घेताना खूप संघर्ष करावा लागला , तुम्हाला शिक्षणासाठी सर्व दारे खुली झाली आहेत. तुम्ही या सुविधांचा फायदा घ्या व खूप मोठे व्हा. ”
डॉ. संजय कोकाटे म्हणाले , “ मुलांनो , तुम्ही क्रीडास्पर्धेमध्ये अतिशय छान कामगिरी केल्याबद्दल तुमचं अभिनंदन. शिडवणे पाष्टेवाडी ग्रामस्थ मुंबई मंडळाने मुलांसाठी स्वेटर देण्याचा केलेला विचार आम्ही खरोखरच स्तुत्य आहे. तरीही मुलांनी या मदतीची मोठेपणी जाणीव ठेवली पाहिजे. आपणही पुढे अशीच समाजाला मदत करण्यासाठी नेहमीच पुढे सरसावले पाहिजे. ”
कार्यक्रमाला शिडवणे सरपंच मा. रविंद्र शेट्ये , राष्ट्रपती पोलीसपदक प्राप्त निवृत्त अधिकारी मा. विजय टक्के , निवृत्त ग्रामविकास अधिकारी मा. बी. एस. कोकाटे , शिडवणे तंटामुक्ती अध्यक्ष मा. अनिल पांचाळ , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. सुप्रिया पाष्टे , उपाध्यक्षा मा. संचिता टक्के , शिक्षणतज्ज्ञ मनोहर कोकाटे , पोलीसपाटील मा. समीर कुडतरकर , माजी अध्यक्ष दिनेश रांबाडे , शिडवणे पाष्टेवाडी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाष्टे , मंडळाचे कार्यकर्ते दत्ताराम रांबाडे , शिवराम वारिसे , चंद्रकांत वाघरे , आकाराम रांबाडे , मधुकर पाष्टे , महादेव वाघरे , तारीफ शेख , योगेश सुतार , अन्वी येतकर , मेघना सुतार , सायली सुतार , सचिन सुतार , स्नेहा पांचाळ , अर्चना पाष्टे , मानसी रांबाडे , नदीम शेख , योगिता सुतार , जान्हवी टक्के , धाक्रस , समिता सुतार , उपशिक्षिका सीमा वरुणकर आणि शाळा व्यवस्थापन समिती , शिक्षक पालक संघ , माता पालक संघ बहुसंख्य सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. त्यानंतर सर्वांना शाळा व्यवस्थापन समितीच्या व शाळेच्या वतीने सर्वांना अल्पोपहार व चहा देण्यात आला. मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

error: Content is protected !!