माजी आमदार विजय सावंत मंत्री नितेश राणेंच्या भेटीला

नागपूर येथील मंत्री नितेश राणेंच्या दालनातील फोटो सध्या बनलाय चर्चेचा विषय
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बदलत्या राजकीय वाटचालीचा फोटोतून संदेश
राजकारणात कायम कुणी कुणाचा शत्रू किंवा मित्र नसतो असे म्हटले जाते. एकेकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच नारायण राणे, नितेश राणे यांच्यावर आरोप करणारे व त्यांची अनेक प्रकरणे उघड करण्याचा गर्भित इशारा देणारे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते अशी ओळख असलेले काँग्रेसचे माजी आमदार विजय सावंत यांनी नुकतीच नवनिर्वाचित मंत्री नितेश राणे यांची नागपूर येथे भेट घेतल्याचा फोटो सध्या चर्चेत आला आहे. माजी आमदार विजय सावंत यांच्या शिडवणे येथील त्या वेळी होऊ घातलेल्या साखर कारखान्याच्या वेळी राणे विरुद्ध सावंत हा वाद मोठा उफाळला होता. त्यानंतर विजय सावंत यांनी निवडणूक देखील लढवली होती. व त्यात त्यांचा पराभव देखील झाला होता. त्यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर अनेक कथित आरोप केले होते. मात्र त्यानंतर कालांतराने या सर्व घडामोडींमध्ये बदल झाला. राजकारण बदलले. राज्यात भाजपा महायुतीचे सरकार सत्तेत आले. आणि कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे हे मंत्री झाले. त्यानंतर बदललेल्या राजकीय घडामोडी आता फोटो व कॅमेरामध्ये कैद होऊ लागल्या आहेत. त्यातलाच हा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या नागपूर येथील दालनात शिवसेना उपनेते संजय आंग्रे, विधानसभा प्रमुख संदेश पटेल या दोघांसही माजी आमदार विजय सावंत यांचा मंत्री नितेश राणेंच्या दालनातला फोटो येत्या काळातील नवीन राजकीय समीकरणांची नांदी दाखवणारा ठरणार आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली