आचरा गावपळण ठरली.रविवार 15डिसेंबरला गावपळण होणार
देवदिवाळीला रामेश्वराच्या कौलप्रसादाने ठरली–तीन दिवस तीन रात्री गाव जाणार वेशीबाहेर
बहुचर्चित आणि ग्रामस्थांना प्रतिक्षा असलेली संस्थान आचरे गावची गावपळण
सोमवारी दुपारी देवदिवाळी दिवशी रामेश्वराच्या कौलप्रसादाने ठरली. रविवारी 15डिसेंबरला गावपळण होणार असल्याचे देवस्थान मानकरी यांनी सांगितले.
दर चार ते पाच वर्षांनी गावपळणीचे वर्ष आल्यावर देवदिवाळीला बारापाच मानकरी दुपारी रामेश्वर मंदिरात जमून गावपळणीचा रामेश्वराला कौल प्रसाद घेतात. सोमवारी दुपारी देवदिवाळीला सर्व मानकरी, कमेटीदार मंदिरात जमून रामेश्वराला गावपळणीचा कौल प्रसाद घेतला गेला. यावेळी उत्सुकतेपोटी ग्रामस्थांनीही मंदिरात गर्दी केली होती. यावर्षी गावपळण व्हावी म्हणून ग्रामस्थांची उत्सूकता शिगेला पोहोचली होती. काही काळाच्या प्रतिक्षेनंतर गावपळण होण्याबाबत रामेश्वराचा कौल प्रसाद झाल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार दत्त जयंतीच्या दुसरया दिवशी
. 15डिसेंबरला रविवारी दुपारी गावपळणीला सुरुवात होणार आहे. गावपळणी दिवशी दुपारी तोफांच्या आणि नौबतीच्या इशारयावर आचरावासिय गाव सोडण्यास सुरुवात करतात.वेशीबाहेर उभारलेल्या राहुट्यात सहजीवनाचा आनंद घेत तीन दिवस तीन रात्री आनंदात घालवणार आहेत.चौथ्या दिवशी पुन्हा गावभरण्याचा कौल घेऊन गाव भरला जाणार आहे. सर्व धर्मियांचा रहिवास असलेल्या आचरे गावात गावपळणीची हि प्रथा खुप पुर्वीपासून सुरू आहे. गावपळण अनुभवण्यासाठी चाकरमानीही मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. या अगोदर 12 डिसेंबर 2019ला गावपळण झाली होती.