वायंगणी येथील पक्षी गणणेत नव्वदहून अधिक प्रजातींची नोंद–पक्षी निरिक्षक डॉक्टर मगदूम

राखी डोक्याचा बुलबुल ही संकटग्रस्त प्रजाती वायंगणी गावात आढळून आली

दिनांक५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या दरम्यान साजरा करण्यात येणाऱ्या पक्षी सप्ताहाचे निमित्त साधून मालवण तालु्यातील वायंगणी येथे पक्षीनिरीक्षक डॉ. श्रीकृष्ण मगदूम आणि चिंदर येथील वन्यजीव अभ्यासक स्वप्नील गोसावी यांनी सोमवारी सकाळी केलेल्या पक्षी गणणेत नव्वद हून अधिक प्रजातींची नोद झाल्याची माहिती दिली.यात राखी डोक्याचा बुलबुल ही संकटग्रस्त प्रजाती वायंगणी गावात आढळून आल्याचे मगदूम यांनी सांगितले. यावेळी वायंगणी हायस्कूलच्या छोट्या मुलांनीही सहभाग घेतला होता.
याबाबत माहिती देताना डॉ मगदूम यांनी सांगितले की
वायंगणी गाव जैवविविधतेच्या दृष्टीने संपन्न आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने आजूबाजूच्या इतर गावांच्या तुलनेत लहान असणाऱ्या वायंगणी गावात वन्यजीवांच्या दृष्टीने महत्वाचे असणारे अधिवास आहेत.
घनदाट जंगल, पाणथळ जागा, विस्तारलेले सडे आणि समुद्रकिनारे हे प्रमुख अधिवास वायंगणी गावात आढळून येतात. अधीवासानुसार त्या त्या भागात आढळणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजाती बदलत जातात.
सोमवार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते अकरा आणि दुपारी चार ते पाच या वेळेत घेतल्या गेलेल्या या पक्षीगणनेत नव्वदहून अधिक पक्ष्यांच्या नोंदी करण्यात आल्या.
यामध्ये शिंजिर, फुलटोचा, शिपाई बुलबुल, शिंपी, पल्लवपूच्छ कोतवाल, तांबट, कुटूरगा, व्याध यांसारखे स्थानीक पक्षी आढळून आले. तर, पांढुरका भोवत्या, माँटेगुचा भोवत्या, धुतर ससाणा, हिरवा वटवट्या यांसारखे स्थलांतरीत पक्षी आढळून आले.
यंदा झालेला मुबलक पाऊस शिवाय अधिक लांबलेल्या परतीच्या पावसामुळे वायंगणी गावातील पाणथळ जागा अजूनही तुडुंब भरलेल्या आहेत. या पाणथळ जागांमध्ये लहान आणि मोठा बगळा, राखी बगळा, छोटा आणि भारतीय पाणकावळा, टिबुकली, कुवा, ढोकरी, कमळपक्षी, पाणलावा यांसारखे अनेक पक्षी आढळून आले.
महत्वाचं म्हणजे राखी डोक्याचा बुलबुल ही संकटग्रस्त प्रजाती वायंगणी गावात आढळून आली आहे.
या पक्षीगणनेत ज्ञानदीप हायस्कूल, वायंगणी या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सक्रीय आणि उत्साही सहभाग घेतला. ज्ञानदीप हायस्कूलचे मुख्याध्यापक टकले सर आणि जाधव सर यांनी या पक्षीगणनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतचे विद्यार्थी सकाळच्या पक्षीगणनेच्या सत्रास उपस्थीत होते. दिवाळीची सुट्टी सुरु असूनही विद्यार्थी भल्या सकाळी या पक्षीगणनेच्या सोहळ्यास उपस्थित राहीले ही नक्कीच उल्लेखनीय आणि कौतुकास्पद गोष्ट आहे. स्थानीक आणि स्थलांतरीत पक्ष्यांविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली शिवाय अत्यंत उत्साहाने दुर्बीण आणि कॅमेऱ्याचा वापर करुन पक्षनिरीक्षणही केले. एकंदरीत इथला निसर्ग आणि इथले अधिवास पुढच्या पिढीच्या हातात सुरक्षीत आहेत असे मत डॉक्टर मगदूम यांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!