“त्या” रेकॉर्डिंगशी माझा कोणताही संबंध नाही- निलेश राणे

निलेश राणेंचे स्पष्टीकरण; माझं नाव वापरून कोणी पैसे मागत असेल तर पोलिसात तक्रार करा
माझ्या नावाने ठेकेदारांकडे पैसे मागणाऱ्या “त्या” रेकॉर्डिंगशी माझा कोणताही संबंध नाही. आम्ही ठेकेदारी करत नाही आणि ठेकेदाराशी भागीदारी ठेवत नाही. त्यामुळे ती रेकॉर्डिंग खोडसाळ आहेत, असे स्पष्टीकरण महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिले आहे. दरम्यान अशा प्रकारे कोणी माझ्या नावावर पैसे मागत असल्यास थेट पोलिसात तक्रार करा, मला बदनाम करण्यासाठी काही लोकांकडून हा बनाव रचला जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. राणे यांच्या नावाचा वापर करून काही कार्यकर्ते ठेकेदारांना फोन करीत असल्याचे रेकॉर्डिंग आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मतदार संघात व्हायरल झाले होते. याबाबत श्री. राणे यांनी असे म्हटले आहे की, माझ्या नावाचा गैरवापर करून काहीजण मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. त्या रेकॉर्डिंगशी माझा कोणताही संबंध नाही. मी स्वतः ठेकेदारी करत नाही किंवा ठेकेदारांची भागीदारी ठेवत नाही. त्यामुळे ज्यांचा व्यवसाय ठेकेदारीचा आहे त्यांनी अशा प्रकारे माझ्या आरोप करण्या अगोदर कुठल्याही शासकीय कामाला संबंध असल्यास तो पुराव्यानिशी जाहीर करावा, नाहक बदनामी करू नये.