अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भात पिकाचे तात्काळ पंचनामे करा!

आमदार नितेश राणे यांच्याकडून मागणी
यापूर्वी देखील वेधले होते जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष
अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ केला असून, अवकाळी पावसामुळे कणकवली मतदारसंघातील भात शेती चे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या भात पिकाचे पंचनामे करा अशी मागणी यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. मात्र अवकाळी पाऊस अद्यापही सुरू असून अद्याप पंचनामे झालेले नाहीत. व त्यातच भात कापणी हंगाम सुरू झाल्याने तात्काळ हे पंचनामे व्हावेत अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात येणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली. कणकवली मतदारसंघातील शेतकऱ्यांचे भात पिक हे प्रमुख उत्पन्न आहे. त्यातच ऐन दिवाळीच्या तोंडावर पावसाने अक्षरशः कहर माजवला आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने या कालावधीत नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाला काही निकष पुरे करावे लागतात. त्यामुळे तत्पूर्वी सद्यस्थितीत नुकसान झालेल्या भाताचे पंचनामे करावेत अशी मागणी यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मात्र त्यानंतर अद्यापही पाऊस सुरू असताना पंचनामे झालेले नाहीत. अवकाळी पावसामुळे जमीन दोस्त झालेल्या भात पिकाला कोंब आले असून हे भात पीक पूर्णता वाया गेले आहे. त्यामुळे याचे कापणीपूर्वी पंचनामे होण्याची गरज आहे. असे देखील श्री राणे यांनी सांगितले.