अखेर कुडाळ मालवण मतदारसंघातील दुसऱ्या “वैभव नाईकांचा” उमेदवारी अर्ज अवैध

विद्यमान आमदार वैभव विजय नाईक यांनी नामनिर्देशन पत्र छाननी वेळी घेतली होती हरकत

निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळोशे यांचा निर्णय

कुडाळ मालवण मतदार संघामध्ये विद्यमान आमदार व महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव विजय नाईक यांच्या विरोधात वैभव जयराम नाईक यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज अखेर अवैध ठरवण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळोशे यांनी हा निर्णय दिला आहे. वैभव जयराम नाईक यांच्या अर्जावर छाननी वेळी वैभव विजय नाईक यांनी हरकत घेतली होती. त्यांनी दिलेल्या सूचकापैकी एक सूचक यांनी गैरसमजुरीतून सही केल्याचे सांगितले होते. त्यावर तसे प्रतिज्ञापत्र सादर करा असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगत एक तासाचा वेळ दिला होता. या छाननीच्या वेळी त्या सूचकास आत मध्ये जाण्यास अडथळा देखील झाल्याने तेथे वादाचा प्रसंग घडला होता. प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर या हरकतीवर निर्णय देण्यास वेळ घेण्यात आला होता. अखेर काही वेळापूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आमदार वैभव विजय नाईक यांनी घेतलेली हरकत मान्य करत अपक्ष उमेदवार वैभव जयराम नाईक यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला आहे. त्यामुळे वैभव जयराम नाईक यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. नावामध्ये साधर्म्य असल्याने आमदार वैभव विजय नाईक यांची मत विभागणी होण्याची शक्यता होती मात्र आता ती शक्यता संपली आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!