मालवणात उतरला संकटग्रस्त ‘मोठा जलरंक’.

  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच नोंद.

  • आचरा–अर्जुन बापर्डेकर

मालवण मधील पर्यटनाचा केंद्रबिंदू असणारं रॉक गार्डन, पर्यटकांना नेहेमीच आकर्षित करतं. विशेषतः संध्याकाळच्या वेळी निळ्याशार समुद्रात अस्ताला जाणारा दिनकर पाहण्यासाठी पर्यटक इथे गर्दी करतात. गणेश चतुर्थीला आलेले मुंबईकर चाकरमानी आणि इतर पै पाहुणे एव्हाना निघून गेले आहेत. पण एक पाहुणा मात्र फार लांबून आणि फार मोठा प्रवास करून मालवणात दाखल झाला आहे.
तो पाहुणा इतर कोणी नसून ‘मोठा जलरंक ‘ नावाचा पक्षी आहे.
या पक्षाचं इंग्रजी नाव “ग्रेट नॉट” असं आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीला हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे पक्षी सायबेरीयातून दक्षिण आशियात येतात. मध्यम आकार असणाऱ्या या पक्षाची चोच गडद तपकीरी, काळपट रंगाची असते. हा पक्षी पांढरट-करड्या रंगाचा असून, याचे पाय पिवळसर तपकिरी रंगाचे असतात. अशी माहिती पक्षी निरीक्षक डॉक्टर मगदूम यांनी दिली. रविवार पासून हा पक्षी मालवण समुद्र किनारी आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले
हिवाळ्यादरम्यान, दक्षिण भारतातील किनारपट्टी भागातील समुद्र किनारे आणि चिखलठाणांवर खाद्य मिळविण्यासाठी चोचीने रेती आणि चिखल चिवडताना ते आपल्याला दिसू शकतात. क्वचित प्रसंगी समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या सपाट खडकाळ भागांवरही हे आढळून येतात. छोटे किडे आणि आकाराने छोटे, अंगावर कवच असणारे प्राणी, हे यांचं मुख्य खाद्य आहे.
गेल्या काही वर्षांपासून या पक्षांची संख्या झपाट्याने कमी होत आहे, त्यामुळे ” इंटरनॅशनल युनियन फॉर कन्सर्वॅशन ऑफ नेचर ” या संस्थेने या पक्षाचा समावेश संकटग्रस्त प्रजातींच्या यादीत केला आहे. प्रदुषण आणि अधिवासाचा ऱ्हास ही या पक्ष्यांची संख्या कमी होण्यामागची प्रमुख कारणे आहेत.
गेल्या चार पाच दिवसांपासून हा पक्षी मालवण मधील रॉक गार्डन परिसरात वास्तव्यास असल्याचे त्यांना आढळून आले.

error: Content is protected !!