मणेरीतील ‘ त्या ‘ बेपत्ता तरुणाचा अनैतिक संबंधातून खून
दोडामार्ग पोलिसांनी दोन वर्षांनी लावला खुनाचा छडा
खून प्रकरणी उसपमधील तिघांना अटक
मुख्य संशयिताचे होते मृत तरुणाच्या पत्नीशी अनैतिक संबंध
मणेरी धनगरवाडी येथून दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या उमेश बाळू फाले (वय ३२ ) या युवकाचा खून झाल्याचे उघड झाले आहे .तब्बल दोन वर्षांनी या खुनाचा छडा लावण्यात दोडामार्ग पोलिसांना यश आले .या खूनप्रकरणी उसप मधील तिघांना अटक करण्यात आली आहे. तिघांनी त्याला दारू पाजून नंतर त्याचा खून केला आणि मृतदेह गोव्याकडे जाणाऱ्या कालव्यात फेकून दिला होता.यातील मुख्य संशयित आरोपीचे आणि खून झालेल्या तरुणाच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते.त्यावरून तो मुख्य संशयिताला शिवीगाळ करत असल्याच्या रागाने तिघांनी मिळून त्याचा काटा काढला.पोलिसांनी या खून प्रकरणी राजाराम उर्फ ओला काशिराम गवस,सचिन महादेव बांदेकर व अनिकेत आनंद नाईक (सर्व रा. उसप) या तिघांना गुरुवारी २२ ऑगस्टला ताब्यात घेतले.
उमेश बळी फाले २८ मे २०२२ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता बाजारात जाऊन दूध घेऊन येतो असे पत्नीला सांगून घराबाहेर पडला तो घरी आलाच नव्हता.त्याची कुटुंबीय व नातेवाईकांनी शोधाशोध करुन अखेर त्याचे काका संतोष नाऊ फाले यांनी २३ मे रोजी दोडामार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान, उमेश फाले याचे अपहरण करून खून करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यावरून पोलिसांनी २१ ऑगस्ट रोजी नवीन गुन्हा नोंद करून २२ ऑगस्ट रोजी तिन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतले.त्यातील एकजण गोव्याला पळून जात असताना तर दोघांच्या गावात जाऊन पोलिसांनी मुसक्या आवळल्या.उमेश फाले याला दोडामार्ग धाटवाडी येथे कालव्याजवळ दारू पिण्यासाठी नेऊन त्याला अतिशय क्रूरपणे ठार केले .यातील अनिकेत नाईक याने त्याचे हात धरले तर सचिन बांदेकर याने त्याचे पाय धरले.मुख्य संशयित राजाराम गवस याने त्याच्या गुप्तांगावर लाथा व डोक्यात दगड घालून त्याचा खून केला व मृतदेह सुमारे दीडशे मीटर फरपटत नेऊन गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या तिलारी कालव्यात फेकून दिला.
पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलिस हवालदार राम माळगावकर, दीपक सुतार, स्थानिक गुन्हा शाखेचे अनुप कुमार खंडे, प्रकाश कदम, आशिष गंगावणे, प्रमोद काळसेकर यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आणि अखेर २७ महिन्यांनी खुनाला वाचा फुटली.पोलिसांच्या या कामगिरीबद्दल कौतुक होत आहे.
फोटो… राजाराम उर्फ ओला गवस